ईडीच्या नोटीसा पाठवून महाविकास आघाडीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय : जयंत पाटील

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली आहे. त्यांना मंगळवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे सांगण्यात आले होते. परंतु ईडीने बजावलेल्या नोटीसमध्ये नेमक्या कोणत्या प्रकरणाची चौकशी करायची आहे याचा स्पष्टं उल्लेख नाही. मात्र अनिल परब यांना आलेल्या नोटिसीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय.

आज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी अनिल परब यांना बोलावण्यात आलं आहे. कोणत्या प्रकरणाशी संबंधित चौकशीला बोलावलं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसेच काल शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्याशी संबंधित काही संस्थांवर ईडीने छापे टाकले आहेत. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या देखील अडचणी ईडीने वाढवल्या आहेत.

दरम्यान, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनिल परब हे ईडीला कायद्याने उत्तर देतील. मात्र, परब यांच्याशी माझी अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही,’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी भाजपवर हल्लाबोल देखील केला. ‘महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांना नोटीसा पाठवल्या जात आहेत.

हे भाजपचे राजकारण आहे. महाविकास आघाडीचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येते. खासदार भावना गवळी यांच्याकडे छापे पडले हे माझ्या कानावर आले आहे. पण महाविकास आघाडीचे नेते अशा प्रकारच्या दबावाला बळी पडणार नाहीत’, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा