औरंगाबाद महापालिकेत बदल घडवू – आस्तिक कुमार पाण्डेय

शहराला ऐतिहासिक वारसा असून, गतवैभव परत मिळविण्याची गरज आहे. त्यासाठी आगामी काळात काम करू. राज्यात कुठेही जा, राजकीय महापालिकेच्या कारभारात हस्तक्षेप असतोच. महापालिकेत अनेक प्रश्‍न आहेत. ते प्रश्‍न एका दिवसात सुटणार नाहीत; मात्र बदल घडविण्याचे आपले ध्येय असून, त्यासाठी नागरिकांचे सहकार्यदेखील आवश्‍यक आहे, असे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले.

महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना ते म्हणाले, ‘दिवसभरात अनेक नगरसेवक, पदाधिकारी भेटले. महापालिकेची वसुली कमी असल्याने विकास कामे ठप्प आहेत. ही कामे महापालिका निवडणुकीपूर्वी मार्गी लागावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आर्थिक शिस्त लावणे, स्मार्ट सिटीची कामे, शासनाने मंजूर केलेली 1,680 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, बीओटी प्रकल्प मार्गी लावण्याच्या कामाला आपले प्राध्यान्य राहील. महापालिकेचे प्रश्‍न सर्वांनाच माहीत आहेत. त्यात आपण बदल घडवू. शहराला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न असेल. प्राधान्य ठरवून कामे केली जातील. औरंगाबाद महापालिकेत पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप अधिक असतो, त्यावर तुम्ही तोडगा कसा काढणार या प्रश्‍नावर, कुठेही जा; हीच परिस्थिती कायम आहे. त्यावर आज बोलणार नाही. पुढे पहा काय होतेय”, असे उत्तर आयुक्तांनी दिले.

शहरावर कचऱ्याचे मोठे संकट उभे राहिले होते; मात्र आज ती परिस्थिती राहिली नाही. चारपैकी एक प्रकल्प पूर्ण झाला आहे. उर्वरित प्रकल्प लवकरच पूर्ण होतील. शहराचा कचरा होऊ देणार नाही, असेही पाण्डेय यांनी सांगितले. शहरात पूर्वी काम केलेल्या आयुक्तांसोबत चर्चा करून आढावा घेतला असल्याचा दावा त्यांनी केला.

आस्तिक कुमार पाण्डेय हे लखनौ (उत्तरप्रदेश) येथील रहिवासी असून, शिक्षण अलाहाबाद, दिल्ली येथे झाले. झारखंड विद्यापीठात त्यांनी सहायक प्राध्यापक म्हणून नोकरीही केली. त्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून काम केले. वर्ष 2011 मध्ये ते आयएएस अधिकारी झाले. नागपूर येथे उपविभागीय अधिकारी, त्यानंतर जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला येथे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रत्येकी दोन वर्षे काम केले. गेल्या दहा महिन्यांपासून बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून आस्तिक कुमार पाण्डेय काम पाहत होते. स्टॉम प्रोजेक्‍टमध्ये शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती 29 टक्‍क्‍यांवरून चार टक्‍क्‍यांवर आणणे, तीन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना जेवण उपलब्ध करून देणे, पंतप्रधान आवास योजनेत जळगाव जिल्ह्याला प्रथम प्रथम क्रमांकावर आणणे हे त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. शासनाने त्यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरवही केला आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.