राज्य सरकारमुळे कोकणात पूरस्थिती : प्रवीण दरेकर

मुंबई : मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. कोकणात तर पावसाचा हाहाकार सुरू आहे. चिपळूण आणि खेड शहर पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. हजारो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. एनडीआरएफचं एक पथक चिपळूणमध्ये दाखल झालं असून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे.

चिपळूणमध्ये 2005 नंतर भीषणपरिस्थिती उद्भवली आहे. वशिष्ठी,शिव नदीला पूर आला आहे. खेडमध्येही जगबुडी नदीला महापूर आला आहे. तर, अनेक गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत. अतिशय भयावह स्थिती त्याठिकाणी उद्भवली आहे. चिपळूणमध्ये मदतकार्याला सुरुवात झालीय. घरांमध्ये अडकलल्या नागरिकांना बोटीनं बाहेर काढण्यात येतंय.

राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती निर्माण होऊन याचा फटका कोकणवासियांना बसल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी केला. कोकणाला अतिवृष्टीचा धोका असल्यामुळे कोकणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची विनंती आपण राज्य सरकारकडे केली होती. परंतु सरकारने याविषयी तातडीने कुठलेही गंभीर पाऊल उचलले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

अतिवृष्टीमुळे कोकणात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत बोलताना दरेकर म्हणाले, गेल्या १० दिवसांपासून मुंबईची तुंबई झाली. दरडी कोसळून अनेक लोक मृत्युमुखी पडले. तसेच कोकणातही हवामान खात्याने रेड अलर्ट दिला असूनही राज्य सरकारने कोकणात कोणतेही पूर्वनियोजन केले नाही. प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडली असून कोकणवासीयांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा