Bharat Jodo Yatra – राहुल गांधींच्या कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीरपर्यंतच्या भारत जोडो यात्रेचे यश बघितले तर सर्वप्रथम त्यांना विरोधक गैर-गंभीर राजकारणी म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करीत होते या भारत जोडो यात्रेने विरोधकांचा डाव मोडून काढला आहे. हवामान आणि भौगोलिक आव्हानांच्या गुंतागुंतीमध्ये 7 सप्टेंबर रोजी देशाच्या दक्षिण टोकापासून सुरू झालेला सुमारे 4,000 किलोमीटरचा प्रवास पार पाडणे सोपे काम नव्हते. हाड गोठविणाऱ्या थंडीत त्यांना सतत टी-शर्टमध्ये राहणे हा कुतूहलाचा विषय ठरत आहे.राहुल गांधी यांनी शारीरिक आणि मानसिक सहनशक्ती या यात्रेत दाखवली आहे, यात शंका नाही. 135 दिवसांच्या यात्रेने राहुल गांधी यांची लढाऊ नेता म्हणून प्रतिमा निर्माण केली, ते भाजप आणि संघावर सतत हल्लाबोल करत होते आणि देशाच्या बहुलवादी संस्कृतीच्या रक्षणाबद्दल बोलत राहिले. देशात कुठेतरी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक लढाऊ नेता उभा असल्याचा संदेश गेला आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, या विधानाचे खंडन करण्याचा प्रयत्न ते करत राहिले. दुसरीकडे, आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष संघटनेत चैतन्य ओतण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. राहुल गांधींच्या या वाटचालीने काय साध्य झाले, अशी चर्चा देशाच्या राजकीय पटलावर सर्रास सुरू आहे. पदयात्रेत मिळालेल्या पाठिंब्याचे रुपांतर आगामी निवडणुकीत राहुल यांना मतांमध्ये करता येईल का? ते एनडीए सरकारच्या विरोधात महाआघाडी स्थापन करू शकतील का? मात्र, यात्रेत विविध राज्यांत सरकार चालवणाऱ्या विरोधी पक्षांच्या अपेक्षित पाठिंबा त्यांना मिळू शकला नाही, हेही खरे. त्यांच्या यात्रेत मोजकेच विरोधी पक्ष सामील झाले आहेत.
या पदयात्रेनंतर काँग्रेस आगामी सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पक्षाचे नेतृत्व करण्याच्या स्थितीत आली आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. इथे प्रश्न असाही येतो की भाजपने २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजवले असताना, राहुल गांधी मोदी-शहा यांच्याशी टक्कर देण्याच्या स्थितीत आहेत का? असे असले तरी, नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आणि त्यांची सहानुभूती मिळवण्यात राहुल गांधी काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत, असे म्हणता येईल. याचं कारण म्हणजे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्न आणि समस्या राहुल यांनी त्यांच्या पदयात्रेत जोरदारपणे मांडल्या आहेत. पण काँग्रेसला हे लक्षात ठेवावे लागेल की स्पष्ट, निर्णायक, व्यावहारिक संघटनात्मक रणनीती नसताना राहुल यांच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळू शकत नाही. भारत जोडो यात्रा ही या दिशेने प्रयत्नांची नांदी म्हणता येईल.
दुसरीकडे, काश्मीरमधील पदयात्रेच्या समारोपाच्या वेळी शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर आयोजित रॅलीमध्ये राहुल यांच्या भावनिक संवादाने किमान काश्मीरमधील जनतेच्या मनाला भिडले आहे. देशाच्या संस्कृतीतील विविधतेच्या बाजूने आवाज उठवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. तसेच हिंसाचाराच्या वेदना जाणवण्याबद्दल बोलले आणि ते संपवण्यासाठी व्यावहारिक उपायांवर भर दिला. कट्टरतावाद नाकारत त्यांनी अहिंसेच्या पुजाऱ्यांच्या समृद्ध परंपरेचा संदर्भ देत महात्मा गांधींचे स्मरण केले. राहुल गांधींच्या दौऱ्याचे यश भाजपला मान्य नसले तरी राहुल यांनी भाजपसमोर अनेक आव्हाने नक्कीच निर्माण केली आहेत.
आता ते राहुल यांच्या दौऱ्यातील यशाचे खर्या यशात रूपांतर कसे करतात हे काँग्रेसच्या धोरणकर्त्यांवर अवलंबून आहे. या वर्षी नऊ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका याची कसोटी लागणार आहे. निःसंशयपणे, काँग्रेसला संघटनेसह अनेक पातळ्यांवर कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. या प्रवासातून मिळालेल्या अनुभवातून राहुल एक परिपक्व राजकारणी म्हणून उदयास येतील अशी अपेक्षा आहे.
विकास परसराम मेश्राम
vikasmeshram04@gmail.com
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “पंतप्रधान मोदी अशा खोटारड्या माणसाला सोबत कसं ठेवतात?”; राऊतांचा निशाणा कुणावर?
- IND vs AUS | कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका! ‘हा’ खेळाडू मालिकेतून बाहेर
- Gopichand Padalkar | अजित पवारांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरली; म्हणाले…
- Car Safety Features | उत्कृष्ट सुरक्षा फीचर्ससह बाजारामध्ये उपलब्ध आहेत ‘या’ कार
- World Cancer Day | दरवर्षी जागतिक कर्करोग दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या सविस्तर