मोठी घोषणा; संपूर्ण सांगली जिल्ह्यात होणार कडक लॉकडाऊन

महाराष्ट्रात कडक निर्बंध लादले आहेत तरीही रस्त्यांवरील गर्दी अजूनही कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आता स्थानिक पातळीवर कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला जात असून सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनीही जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

“बुधवार दि. ५ मे रोजी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला जाईल,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. “काल सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १५६८ वर पोहोचली तर ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही बाब अतिशय गंभीर आहे. परिस्थिती आटोक्यात आणायची असेल, तर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय आम्ही घेत आहोत,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

“आपल्याला ऑक्सिजनची खूप कमतरता आहे, प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावे लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणून ही शृंखला मोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

“जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करतो. तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. घरीच रहा, सुरक्षित रहा,” असं आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा