मोठी बातमी : कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा राजीनामा

मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा राजीनामा देणार आहेत. दुपारी जेवणानंतर राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याची माहिती येडियुरप्पांनी दिली. कर्नाटकमधील येडियुरप्पा सरकारला २ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती.

कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा सुरु असतानाच येडियुरप्पा यांनी पायउतार होण्याचे संकेत दिले होते. गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत भेट घेतली होती. पक्षश्रेष्ठींचे निर्देश मिळाल्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. पक्षश्रेष्ठींचे निर्देश आले की तुम्हालाही त्याबाबत कळेलच, असे येडियुरप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. आपण केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य करू याचा पुनरुच्चार त्यांनी केला होता. आपण समाधानी असून पक्षाची शिस्त मोडणार नाही, असेही ते म्हणाले होते.

“कर्नाटकातील जनतेच्या मी ऋणात आहे. मी अधिकारी आणि आमदारांना सांगू इच्छितो, की जनतेने आपल्या सर्वांचा विश्वास गमावला आहे. आपण अधिक कठोर आणि स्वच्छ- प्रामाणिक मार्गाने कार्य केले पाहिजे. बरेच अधिकारी प्रामाणिक आहेत, मात्र सर्वांनीच ते झाले पाहिजे. बंगळुरु हा जागतिक दर्जाच्या शहरात विकसित होत आहे” अशा भावना येडियुरप्पा यांनी व्यक्त केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा