मोठी बातमी ! विराट कोहलीनं सोडलं भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल जाहीर केले होते. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-20 विश्वचषक क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर विराटच्या या निर्णयाचा क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला होता. तर टी-20 विश्वचषक क्रिकेट संघाची कमान भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माकडे सोपवण्यात आली होती.

त्यानंतर लगेच भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी देखील रोहित शर्माची वर्णी लागली. रोहित शर्माला टी-20 नंतर एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने विराट कोहलीला वनडे कर्णधारपदावरून हटवून ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपली होती. यानंतर आज विराट कोहलीने आणखीन एक मोठा निर्णय घेतला आहे.

विराट कोहली भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराटने आपला निर्णय जाहीर केला. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आज शनिवारी संध्याकाळी विराटने ट्विटरवरून कसोटी कर्णधारपद सोडल्याची घोषणा केली. एक संदेश देताना त्याने संघाच्या कर्णधारपदाची संधी दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार मानले.

कोहलीने लिहिले, “सात वर्षांची मेहनत आणि संघर्ष करून संघाला योग्य दिशेने जाण्याचा मी प्रयत्न केला. मी माझे काम पूर्ण प्रामाणिकपणे केले असून कोणतीही कसर सोडली नाही. कधीतरी थांबले पाहिजे आणि भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याची हीच वेळ आहे. या प्रवासात माझ्यासाठी अनेक चढ-उतार आले आणि माझ्या वैयक्तिक कारकिर्दीतही चढ-उतार आले, पण या काळात माझ्याकडून कधीही प्रयत्नांची कमतरता आली नाही किंवा माझ्यात आत्मविश्वासाची कमतरता आली नाही. माझा १२० टक्के देण्यावर नेहमीच विश्वास होता.”

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा