“उपमुख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धीवर कोट्यवधी रुपयांची खैरात…”; अतुल भातखळकरांची ठाकरे सरकारवर टीका

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी ठाकरे सरकार सहा कोटी खर्च करणार असून बाहेरील एजन्सीवर याची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरला व्हिडीओ ट्विट करत टीका केली आहे.

“लसीकरण महत्वाचे नाही आणि लोकांचे जीवनही… मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सोशल मीडिया नाही चालले तर, त्यांचा PR झाला नाही तर महाराष्ट्राची जनता जगेल कशी? कोरोना हटेल कसा? म्हणून त्यावर फक्त काही कोटी रुपयांचा खर्च. हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल,” अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

“उपमुख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धीवर कोट्यवधी रुपयांची खैरात…यांचे काका आजारपणातून बाहेर आल्यानंतर शेतकरी आणि मराठा आरक्षणाची चिंता नाही, त्यांना बार मालकांची चिंता. जनता, डॉक्टर, नर्सेस पैसे आणि पगाराविना तडफडत आहेत. लोक कोरोनामुळे मरत असतानादेखील या निर्लज्ज आणि बेशरम सरकारला आपल्या प्रसिद्धीची चिंता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी सरकारी पैशांवर नेमलेल्या पीआर एनज्सी तात्काळ रद्द करा आणि याची पूर्ण चौकशी करा,” अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

अजित पवारांचे सोशल मीडिया अकाऊंट्स सांभाळण्याची जबाबदारी एजन्सीवर सोपवण्यात येणार आहे. यात महत्वाचे निर्णय, संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे तसंच सर्वसामान्यांना ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, युट्यूब, इन्स्टाग्राम, साऊंड क्लाऊड, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम चॅनेलच्या मार्फत उपमुख्यमंत्र्यांसोबत संपर्क साधता यावा ही जबाबदारी एनज्सीकडे असेल आदेशात नमूद आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा