BJP । भाजपमध्ये दोन गट? अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेलार-फडणवीस वाद चव्हाट्यावर

BJP । मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून (Andheri East Election) भाजपने माघार घेतली आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरेपर्यंत मोठे राजकारण पाहायला मिळाले. मात्र भाजपाच्या या निर्णयावर समिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. तसेच या निर्णयानंतर भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी  इच्छा व्यक्त केली होती.  यानंतर ही निवडणूक बिनविरोध होणार या चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलं होत. मात्र काल रात्री झालेल्या बैठकीत अखेर भाजपने आपला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतला. मात्र या बैठकीत भाजपा अंतर्गत शेलार आणि फडणवीस यांच्यात वाद झाला असल्याची चर्चा आहे. निवडणुकीतील भाजप उमेदवार मुरजी पटेल हे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे विश्वासू असून त्यांच्यामुळेच पटेल यांना उमेदवारी मिळाली. अन्य काही नेते पटेल यांना उमेदवारी देण्यास अनुकूल नव्हते. त्यामुळेच पटेल यांची उमेदवारी मागे घेण्यास शेलार यांनीच बैठकीत तीव्र विरोध केला. पराभवाच्या भीतीने युतीने उमेदवार मागे घेतला, असा प्रचार होईल आणि महापालिका निवडणुकांना सामोरे जाताना मनोधैर्यावर परिणाम होईल, टीकेला सामोरे जावे लागेल, अशी भूमिका शेलार यांनी मांडली.

मात्र यानंतर ही भाजपने आपला उमेदवार माघार घेतला आहे. आशिष शेलार ही निवडणूक लढवण्यासाठी अतिशय आग्रही होते. याच कारण असं कि,  आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला मतदारांचा कौल जाणून घेण्याची प्रातिनिधीक संधी मिळणार आहे. त्यामुळे भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेऊ नये, असे आशिष शेलार यांचे म्हणणे होत. तसेच आशिष शेलार हे मुंबई प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर मुंबईत पहिलीच निवडणूक होत आहे. यापूर्वी आशिष शेलार हे मंत्रिपदासाठी उत्सुक होते. परंतु, त्यांना मंत्रिपदाऐवजी मुंबई अध्यक्षपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे आता अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जिंकून आशिष शेलार यांना आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवण्याची संधी होती. अंधेरी पूर्वचा मतदारसंघ भाजपकडे खेचून आणण्यासाठी आशिष शेलार यांनी पोटनिवडणुकीत सर्व ताकद पणाला लावल्याची चर्चा होती. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी अंधेरी पोटनिवडणुकीबाबत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने शेलार आणि फडणवीस यांच्यात कालच्या बैठकीत शाब्दिक चकमक झाल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

याआधी देखील आशिष शेलारांनी ट्विट करून अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारीची घोषणा केली होती. भाजपच्या इतिहासात असे पहिल्यांदा घडले. आशिष शेलार यांनी परस्पर उमेदवारीची घोषणा केली. भाजप गटातील आमदारांचा उमेदवार द्यायला सुरुवातीपासून विरोध होता. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. त्यात ही निवडणूक हारली तर त्याचा फटका मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बसेल.  महापालिका निवडणुकीत याचा तोटा व्हायला नक्को म्हणून ही उमेदवारी माघारी घेतली. मात्र अर्ज माघार घेतल्याने सध्या आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आधीपासून सुरु असलेलं कोल्ड वॉर आता पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागलं आहे.

याआधी फडणवीस यांनी आशिष शेलार यांना दाबण्याचा प्रयत्न केला होता. शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी फडणवीसांनी रोखून ठेवला होता. कारण मंत्र्यांच्या लिस्टमध्ये गिरीश महाजन यांचं नाव नव्हते. प्रवीण दरेकर यांचे ही नाव नव्हते. त्यामुळे फडणवीस नाराज झाले होते. केंद्रातून आलेल्या याद्या या फडणवीस यांच्या विरोधात येत असल्याचे चित्र दिसत होत. तसेच फडणवीसांना केंद्रातून विरोध वाढत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत.

मात्र राजकीय दृष्टिकोनातून विचार केला असता आशिष शेलार यांच्या मागे फडणवीसांच्या तुलनेत जास्त आमदार नाहीत. पण तरीही आशिष शेलार महाराष्ट्र भाजपमध्ये सरस ठरत असल्याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. तसेच आशिष शेलार यांचे दिल्लीत चांगले संबंध आहेत. त्याचा फायदा त्यांना महाराष्ट्रामध्ये होत आहे.  सध्या ABVP ची टीम सक्रिय आहे. ती आशिष शेलार यांना दिल्लीतून आणि महाराष्ट्रात मदत करत आहे. काल अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेत देखील मुरजी पटेल यांना पाठींबा देण्याची विनंती केली होती, पण राज ठाकरेंनी देखील नकार दिला होता.

या सर्व घडामोडी घडत असताना आशिष शेलार हे आपले वर्चस्व पक्षात पुन्हा अबाधीत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शेलारांना मात दिली आहे. मनावर दगड ठेवून आशिष शेलार यांनी हा निर्णय पचवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.