BJP | “यात उद्धव ठाकरेंची ‘न घरका ना घाटका’ अशी परिस्थिती”; भाजप नेत्याचा टोला

BJP | मुंबई : राज्यात शिवशक्ती आणि भिमशक्तीच्या युतीची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. युतीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. युती करुन ४ दिवसही उलटले नाही तोच प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याची तुफान चर्चा रंगली. केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल प्रकाश आंबेडकरांनी वक्तव्य केलं आहे. तर, आंबेडकरांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावरून भाजपने उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं. तेव्हा शरद पवार म्हणाले, “अलीकडे आम्ही पाहतोय की, तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात येतोय,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावरून भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी ट्वीट केलं आहे.

“शरद पवार म्हणातायत तपास यंत्रणांद्वारे विरोधकांना त्रास दिला जातोय. प्रकाश आंबेडकर म्हणतायत मोदी तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाही. या विरोधाभासी वक्तव्यांमध्ये उद्धव ठाकरे कोणाची बाजू घेणार? न घरका ना घाटका अशी परिस्थिती होणार,” असा टोला केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाची युती झाल्यापासून प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आंबेडकरांच्या वक्तव्याचा विरोध केला आहे.

महत्वाच्या बातम्या