भाजप चिंतामुक्त होणार; उत्पल पर्रीकर माघार घेणार? रविवारी अमित शहा गोवा दौऱ्यावर

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत सध्या सगळ्यात चर्चेचा विषय ठरला आहे, तो म्हणजे दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपकडून तिकीट मिळणार की नाही. याबद्दल आता यावर चर्चा सुरु होत्या. गोव्यात ४० विधानसभा जागा आहेत. ज्यामध्ये भाजपने आपले ३४ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपने ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सध्या सर्वांचे लक्ष उत्पल पर्रिकर यांना कोणत्या जागेचे तिकिट मिळणार याकडे होते.

मात्र भाजपने जाहीर केलेल्या यादीत उत्पल पर्रिकरांचे नाव नाही आहे. त्यांना पणजीतून उमेदवारी देणार नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आज उत्पल पर्रीकर यांनी आपली पुढची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा करत भाजपविरोधात बंडाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत गोव्याच्या राजकारणात मोठा बॉम फोडला. तसेच त्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

तसेच भाजपकडून पर्रीकरांचे मतपरिवर्तन करण्याचे प्रयत्न सुरू आहे. अशातच येत्या रविवारी गृहमंत्री अमित शहा गोव्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. पर्रीकर यांनी पणजीतून उमेदवारी मागे घ्यावी यासाठी भाजपकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. भाजपचे सरचिटणीस सी. टी. रवी यांनी उत्पल यांना पुन्हा निर्णय बदलण्याची विनंती केली आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मनोहर पर्रीकर यांनी नेहमीच भाजपच्या विजयासाठी कार्य केले. त्यांचा मुलगा उत्पल यांनाही मी निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती करतो. त्यांनी आपला निर्णय मागे घेऊन आपल्या वडिलांचे स्वप्न पुर्ण करावे.गोव्यात केवळ भाजपच स्थिर सरकार देऊ शकते. गोव्यात गृहमंत्री अमित शहा ३० जानेवारी रोजी येणार असल्याचेही रवी यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा