औरंगाबादमध्ये हेल्दी सोसायटी मासिकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात साजरा

औरंगाबाद :  आरोग्य क्षेत्राला वाहिलेल्या हेल्दी सोसायटी या मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी(ता. 20) येथील पत्रकार भवन येथे उत्साहात पार पडले. या मासिकाचे प्रकाशन इंडियन मेडीकल असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. यशवंत गाडे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीरंग देशपांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर, अस्थमा आणि अलर्जी तज्ज्ञ डॉ. नवल मालू, इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसीनचे उपाध्यक्ष डॉ. आनंद निकाळजे, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष रणजीत कक्कड उपस्थित होते.

निरंजन भालेराव यांच्या सुरेल बासरी वादनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. माहितीच्या मायाजालाच्या या काळात बरीच चुकीची माहिती फिरत असते. आरोग्य क्षेत्रातील विश्वसनीय माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या मासिकाची सुरवात केल्याचे संपादक अभिजीत हिरप यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी बोलतांना डॉ. यशवंत गाडे म्हणाले की, औरंगाबादमध्ये आरोग्यविषयक मासिके फार कमी प्रमाणात आहेत. कोरोनाच्या काळात आरोग्यविषयक विश्वसनीय व अधिकृत माहिती देणारे मासिक असणे गरजेचे होते. या मासिकातील माहिती मराठी भाषेत असून त्यातील माहिती ही उपयुक्त आणि संग्रही ठेवण्याजोगी आहे. घरातील प्रत्येक सदस्याला हे मासिक वाचता येणारे आहे. आरोग्य, वैद्यकीय क्षेत्रातील विविध विषयांचा उहापोह या मासिकात झाला असल्याचे त म्हणाले.

डॉ. संतोष रंजलकर म्हणाले की, सोशल मिडीयामुळे लोक काही ना काही वाचत असतात. त्यामुळे त्यांना अधिकृत आणि योग्य माहिती वाचायला देणे गरजेचे आहे, हे मासिक ती गरज भागवणार. अतिशय सोप्या शब्दात आरोग्यविषयक विविध मुद्दे या मासिकात मांडण्यात आले आहेत. आजार, त्यांचा प्रतिबंध, योगासने, स्पोर्ट्स, मेडीसीन यांसारखे वेगवेगळे विषय या मासिकात वाचायला मिळणार आहे.

डॉ. नवल मालू म्हणाले की, आजच्या काळात उच्चशिक्षित लोकही त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतांना दिसतात. कित्येक वर्ष आजार अंगावर काढले जातात. पुढे याचेच मोठ्या आरोग्य समस्येत रूपांतर होते. त्यामुळे आपल्या आरोग्याबाबत जागरूकता असणे गरजेचे असते. ताण तणावापासून दूर राहण्यासाठी, शारीरीक दृष्ट्या तंदुरूस्त राहण्यासाठी दररोज स्वतःला वेळ देणे गरजेचे आहे. हे मासिक समाजात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणारे असल्याचे ते म्हणाले.

डॉक्टर आणि रूग्ण यांच्यातील दुवा म्हणून हेल्दी सोसायटी मासिकाने भुमिका पार पाडावी, अशी अपेक्षा डॉ. आनंद निकाळजे यांनी व्यक्त केली. आरोग्यविषयक विविध विषय या मासिकाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचणार आहेत. आरोग्याचा विषय आणि नेहमी खर्चाशी जोडला जातो, तो गुणवत्तेशी जोडला जात नाही याबाबतही जनजागृती व्हायला हवी. रूग्णांपर्यंत चांगल्या आरोग्यसुविधा पोहचाव्या यासाठी विविध संस्था, संघटनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

रणजीत कक्कड म्हणाले की, आरोग्य टिकवणे ही प्राथमिक गरज आहे. आरोग्यविषयक विश्वासार्ह माहिती देण्यासाठी हेल्दी सोसायटी मासिक प्रयत्न करीत असून हा अतिशय चांगला उपक्रम आहे. आपले आरोग्य टिकवण्यासाठी योग, मेडीटेशन यांचा आपल्या दिनचर्येत समावेश असायला हवा. औरंगाबाद फर्स्ट या सामाजिक संस्थेने आरोग्य जनजागृतीसाठी पुढाकार घेत शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉनसारखे उपक्रम आयोजित केले असल्याचे त्यांनी सांगितले.

मासिकाचे अतिथी संपादक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीरंग देशपांडे म्हणाले की हेल्दी सोसायटी हे आरोग्यविषयक माहिती मराठीतून देणारे एकमेव मासिक आहे. डॉक्टर्स आणि रूग्ण यांच्यात गैरसमजांतून, आर्थिक बाबींमुळे निर्माण झालेली दरी कमी झाली पाहीजे, हे मासिक ही दरी कमी करणारा दुवा बनेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा