पुरग्रस्त भागाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ मोठे निर्देश

मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण, रायगड, सातारा, कोल्हापूर या भागांमध्ये पुराऱ्या पाण्यामुळे आणि दरड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित तसेच वित्तहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून नागरिकांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

“खचलेल्या रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करून वाहतूक सुरू करणे, नादुरुस्त ट्रान्सफाॅर्मर्स आणि वीज मनोऱ्यांची वेगाने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा. त्याचबरोबर पाणी पुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, तर साथीचे रोग पसरू नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी. स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाय, कीटकनाशकांची फवारणी यावर भर द्या,” असं मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सांगितलं आहे.

“नुकसानीची आकडेवारी आणि करण्यात येणाऱ्या मदतीचा तपशीलवार अहवाल तयार करा, म्हणजे नुकसानग्रस्तांना वेळेत व तातडीने मदत मिळेल. पुराचा फटका बसलेले व्यापारी आणि व्यावसायिकांची माहिती एकत्र करून कशाप्रकारे मदत करता येईल, याचा प्रस्ताव तयार करा. तसेच, येत्या काळात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास काय उपाय योजना करण्यात येईल,” याबद्दल मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

“डोंगराळ भागातील खचणारे रस्ते, पायाभूत सुविधांबाबत सर्वंकष आराखडा तयार करा. कोकणात 26 नद्यांची खोरे असून याठिकाणी पुराबाबत इशारा देणारी ‘आरटीडीएस’ यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित करा. जलसंपदा विभागाकडून पहिल्या टप्प्यात सात नद्यांवर येत्या तीन महिन्यात अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे,” असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा