China vs Taiwan | चीनचे तैवानविरोधात शक्तिप्रदर्शन; युद्धनौका आणि क्षेपणास्त्रे घेऊन लष्करी सराव सुरु

महाराष्ट्र देशा डेस्क : अमेरिकेच्या सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे चीन आक्रमक झाला आहे. त्यामुळेच चीनने गुरुवारी तैवानला घेरून आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी सराव सुरू केला आहे. तैवानला वेढा घालताना चिनी लष्कराने त्याभोवती 6 ‘नो एंट्री झोन’ घोषित केले आहेत. ज्यामुळे आता या मार्गाने कोणतेही प्रवासी विमान किंवा जहाज तैवानला जाऊ शकत नाही. लष्करी सरावादरम्यान चीनने आपल्या सर्वात मोठ्या विमानवाहू युद्धनौका, अण्वस्त्रधारी सुपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, स्टेल्थ फायटर जेट्स, गुप्तचर विमाने तसेच विमानविरोधी तोफा आणि हल्ला करणाऱ्या युद्धनौकांचे शक्तीप्रदर्शन केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैन्याने गुरुवारी दुपारी तैवानच्या आसपासच्या समुद्रांमध्ये लष्करी सराव सुरू केला. चीनच्या सैन्याने समुद्रात लाइव्ह फायर सराव केला आहे. हा सराव गुरुवारी दुपारी 12 वाजता सुरू झाला असून तो 7 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अनेक ठिकाणी चीन तैवानच्या भूमीपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर लष्करी सराव करत आहे. यामध्ये चीनचे हवाई दल, लष्कर आणि नौदलाचा समावेश आहे.

तैवानने क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली
चीनच्या या कृतीवर तैवानच्या लष्कराने सांगितले की, “आमचे सैन्य चिनी लष्करी सरावांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आम्हाला युद्ध नको आहे, पण त्यासाठी तयार आहोत.” चिनी नौदलाची जहाजे आणि लष्करी विमानांनी गुरुवारी सकाळी तैवान-चीन सीमारेषा ओलांडली. तर बीजिंगच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तैवानने क्षेपणास्त्र यंत्रणा आणि नौदल जहाजे तैनात केली आहेत. तर तैवान हा युक्रेन नाही, असा इशारा बीजिंगने दिला आहे. तैवान नेहमीच चीनचा अविभाज्य भाग राहिला आहे. हे एक निर्विवाद कायदेशीर आणि ऐतिहासिक सत्य आहे, असं चीनचं म्हणणं आहे.

बुधवारी चीनच्या 27 लष्करी विमानांनी तैवानच्या दिशेने उड्डाण केले. यातील 22 लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत प्रवेश केला. त्याच वेळी, जेव्हा चिनी विमानांना प्रत्युत्तर देण्यासाठी लढाऊ विमानांनी तैवानने परवानगी दिल्याचे कळताच चिनी विमाने परतली. तर तैवानसारख्या लोकशाही जपणाऱ्या मित्राला अमेरिका गमावणार नाही, आम्ही कायम तैवानबरोबर आहोत, असं अमेरिकेने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.