Chitra Wagh | चित्रा वाघांनी सुप्रिया सुळेंना सुनावले खडे बोल; मोठ्या नेत्या म्हणत लगावला टोला

Chitra Wagh | मुंबई: महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था दोन्ही गोष्टी अत्यंत योग्य पद्धतीने पार पडत आहे, अशी माहिती सातत्याने शासनाकडून मिळत असते. अशा परिस्थितीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रामधून दररोज सरासरी 70 मुली गायब होत आहेत. जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान राज्यातून 5510 मुली बेपत्ता झाल्या असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे. या प्रकरणावरून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजप सरकारवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करत सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्या सुप्रियाताई ,महाराष्ट्र असो की अन्य कुठले राज्य, मुली-महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत असेल तर ते चिंताजनकच आहे पण आपण अशा थाटात हा विषय मांडला जणू सरकार बदलले आणि मुली बेपत्ता व्हायला लागल्या असो, आधी विषय समजून घ्या.”

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक विषयाचा एफआयआर केला जातो. मुली बेपत्ता होणे हा एक अतिशय गंभीर विषय आहे. त्यामुळे राजकीय वादविवाद बाजूला ठेवून सर्व महिला नेत्यांनी एकत्र येऊन यावर उपाय सुचवायला पाहिजे. फक्त टीका करायची म्हणून काहीही बोलणं योग्य नाही ताई.”

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातून जानेवारी महिन्यात 1600 मुली गायब झाल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात 1810 तर एप्रिल महिन्यामध्ये 2200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या महिलांची संख्या वाढत चालली आहे.

महत्वाच्या बातम्या