नागरीकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या – नंदकुमार घोडेले

औरंगाबादमध्ये सहा महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुका आणि त्याआधी आलेला वर्धापनदिन या पार्श्‍वभूमीवर महापौर नंदकुमार घोडेले यांनी निधीअभावी मी नागरिकांच्या अपेक्षा पुर्ण करू शकलो नाही असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली. महापौरांच्या या दिलगिरीने वर्धापनदिनीच त्यांनी समारोपाचे भाषण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

प्रायोजकांच्या पैशावर महापालिकेचा 37 वा वर्धापनदिन साजरा केला जात असल्याने आधीच त्यावर टिकेची झोड उठली होती. त्यात या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमांकडे सकाळपासून दुपारपर्यंत अगदी बोटावर मोजण्याइतक्‍याच अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली. त्यामुळे ही उदासिनता पाहून उद्विग्न झालेले महापौर नंदकुमार घोडेले यांनी नाराजीचा सूर आळवला. मात्र थेट कुणावर टिका न करता त्यांनी “नागरीकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र निधीअभावी त्या पुर्ण करु शकलो नाही, याबद्दल मी दिलगिर आहे’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
घोडेले म्हणाले, महापौर म्हणून पदभार घेतल्यानंतर माझ्याकडून नागरीकांच्या मोठ्या प्रमाणात अपेक्षा होत्या. मात्र विकासासाठी निधीच नसल्याने फार मोठी कामे करु शकलो नाही. संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरुस्तीची कामे संथ गतीने सुरु आहेत. याच बरोबर रस्त्यांच्या कामाला लागलेला विलंब या सर्व गोष्टींसाठी मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो.

महापौर म्हणुन काम करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी रागावावे लागले, मात्र ती कामे घोडेलेंच्या घरची नव्हती, नागरिकांसाठी प्रशासनावर दबाव टाकून त्यांची कामे करुन घेणे आमचे कर्तव्य असल्याने तेही करावे लागले. विकासासाठी नियमित कर भरा, कारण त्यावरच विकास अवलंबून आहे असे आवाहन देखील त्यांनी शेवटी केले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.