Climate Change – हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मिश्रित पिकांची गरज

Climate Change – मार्च -2023 चा दुसरा तिसरा आठवडा संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस गारपीट घेवून आला. आणि शेती हा तोट्याचा व्यावसाय आहे हे सिद्ध झाले असून अचानक अवकाळी पाऊस गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बदलत्या ऋतूचे सर्वाधिक वाईट परिणाम शेतीवर पाहायला मिळत आहेत .भारतीय गहू आणि बार्ली संशोधन केंद्र (ICAR) ने इशारा दिला होता की मार्चच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तो उभ्या पिकांसाठी घातक ठरेल. गेल्या काही वर्षांत, अत्यंत प्रतिकूल हवामान परिस्थिती- विशेषतः अचानक अतिवृष्टी – शेतकरी कमकुवत होत आहे, उभे पीक नष्ट होत आहे .

पृथ्वीच्या तापमानात सातत्याने होणारी वाढ आणि त्यातून निर्माण होणारा हवामान बदलाचा भीषण धोका आता जगभर तसेच भारतालाही मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. हे केवळ अवकाळी हवामान बदल किंवा नैसर्गिक आपत्तींपुरते मर्यादित राहणार नाही. अन्नापासून, जलाशयातील पाण्याची शुद्धता, अन्नपदार्थांचे पौष्टिक मूल्य, प्रजनन क्षमता या सर्वच घटकांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे.

दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी कर्जबाजारी राहतो, तेव्हाच त्याला शेती सोडावी लागते

भारतीय कृषी संशोधन परिषदेने केलेल्या संशोधनानुसार 2030 पर्यंत पृथ्वीच्या तापमानात 0.5 ते 1.2 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होणे अपरिहार्य आहे. वर्ष-दर-वर्ष तापमानवाढीचा परिणाम 2050 मध्ये 0.80 ते 3.16 अंश सेल्सिअस असू शकतो. तापमानात एक अंश वाढ म्हणजे प्रति हेक्टर 360 किलो पीक कमी होणे. हवामान बदलामुळे 310 जिल्हे शेतीच्या दृष्टीने संवेदनशील मानले गेले आहेत. यापैकी 109 जिल्हे अतिसंवेदनशील आहेत, जेथे पुढील दशकात कृषी उत्पादन, पशु संपत्ती, कुक्कुटपालन आणि मत्स्य उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तापमानात झालेली वाढ, अवकाळी व असामान्य पाऊस, भीषण उष्णता, पूर आणि दुष्काळ यामुळे पावसाच्या चक्रात होणारे बदल याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होतो. सरकारी आकडेवारीनुसार, उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या कमी झाली असली तरी त्यांचे उत्पन्न मात्र कमी होत आहे. प्रत्यक्षात दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी कर्जबाजारी राहतो, तेव्हाच त्याला शेती सोडावी लागते.

भारत हा हवामान, जमीन-वापर, वनस्पती, जीवजंतू या सर्व बाबतीत विविधतेने नटलेला देश आहे आणि इथल्या हवामान बदलाचा परिणाम काहीशे किलोमीटरच्या अंतरावरही वेगळ्या पद्धतीने होत आहे. पण पाण्याची बचत, कुपोषण आणि उपासमारीचा सामना करण्याची चिंता देशभरात सामान्य आहे. देशात उपलब्ध असलेल्या शुद्ध पाण्यापैकी 75 टक्के पाणी अजूनही शेतीवर खर्च होत आहे. तापमान वाढीमुळे जलस्रोतांवर परिणाम दोन दशकांपासून होत आहे. जर्नल प्रोसीडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधानुसार, भारताला हवामान बदलाचे कृषी परिणाम कमी करताना पोषण पातळी राखायची असेल तर नाचणी, बाजरी आणि भरड धान्याचे उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या डेटा सायन्स इन्स्टिट्यूटने हा अभ्यास केला आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या डेटा सायन्स इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉ. कॅल डेव्हिस यांनी हवामान बदलाचा भारतातील शेतीवर, पोषण स्तरावर, पाण्याची कमतरता आणि शेतीसाठी जमिनीची कमतरता यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, तापमानात वाढ झाल्यामुळे कृषी उत्पादकता कमी होत आहे आणि पोषक तत्वे कमी होत आहेत. भविष्यासाठी इथल्या पाण्याची बचत करायची असेल आणि पोषणाची पातळी वाढवायची असेल, तर गहू आणि तांदूळावरील अवलंबित्व कमी करावे लागेल.

जागतिक तापमाना वाढ ही अन्नसुरक्षेसाठी दुहेरी धोका

अमेरिकेच्या ऍरिझोना राज्याच्या वार्षिक हवामान बदल अहवाल-2017 मध्ये असा इशारा देण्यात आला होता की, हवामानातील बदलामुळे पाण्याचे संरक्षण करणाऱ्या जलाशयांमध्ये अशा प्रकारचे शैवाल विकसित होत आहेत, ज्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. नुकतेच, नॅशनल लेक असेसमेंट विभागाने अमेरिकेतील सुमारे 60,000 जलाशयांच्या पाण्याची चाचणी केली आणि असे आढळले की जलाशयांमध्ये कमी पाणी असल्यास, तापमान आणि आम्लता वाढते. जलाशय कोरडे पडल्यावर अनेक प्रकारची खनिजे आणि अवांछित रसायने पायथ्याशी जमा होतात आणि त्यात पाणी येताच त्याचा गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. या दोन्ही परिस्थिती पाण्यात जन्मणारे मासे, वनस्पती इत्यादींसाठी घातक आहेत व भारतात दरवर्षी ही परिस्थिती निर्माण होत आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे वाढते प्रमाण हे हवामान बदलाचे प्रमुख कारण आहे. हार्वर्ड चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या ताज्या अहवालात असे सूचित होते की यामुळे आपल्या आहारात पोषक तत्वांची कमतरता देखील आहे. तसेच जागतिक तापमानात होणारी वाढ ही अन्नसुरक्षेसाठी दुहेरी धोका आहे. आयपीसीसीसह अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासांमध्ये कृषी उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अन्नधान्य संकट निर्माण होऊ शकते. एका नवीन अहवालात आणखी एका मोठ्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे की कार्बन उत्सर्जनामुळे अन्नामध्ये पोषक तत्वांची कमतरता निर्माण होत आहे. भातासह सर्वच पिकांमध्ये पोषक तत्वे कमी होत आहेत. यामुळे 2050 पर्यंत जगातील 175 दशलक्ष लोकांमध्ये झिंकची कमतरता असेल, 122 दशलक्ष लोक प्रोटीनच्या कमतरतेने ग्रस्त होतील. प्रत्यक्षात 63 टक्के प्रथिने, 81 टक्के लोह आणि 68 टक्के जस्त वनस्पतींमधून पुरवले जातात. हा अहवाल भारतासारख्या देशांसाठी धोक्याचा इशारा आहे कारण कुपोषण ही येथे आधीच मोठी समस्या आहे. या सगळ्या अहवालाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे

लेखक – विकास परसराम मेश्राम

महत्वाच्या बातम्या-