InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

गटशेती, समुह शेतीसाठी सर्व योजनांचा एकत्रित लाभ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणायचे असेल तर यांत्रिकीकरण व सामूहिक शेतीचे महत्व व फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. गटशेती व समूह शेतीच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी होत असल्यामुळे समूह शेती करणाऱ्या शेतकरी गटांना शासनाच्या सर्व योजनांचा एकत्र लाभ देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित ॲग्रोवन सरपंच महापरिषदेच्या उद्घाटन समारंभात विभागातील सरपंचांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. सरपंच महापरिषदेचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यावेळी सकाळ वृत्तपत्र समूहाचे प्रमुख प्रतापराव पवार, प्रोर्स मोटरचे उपाध्यक्ष प्रदीप धाडीवाल, आदिनाथ चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

शेतीची उत्पादकता वाढविल्याशिवाय शेती परवडणार नसल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चानुसार भाव मिळायला हवा. परंतु उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे. शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढावी यासाठी विदर्भातील शेतकऱ्यांना एक लक्ष विजेचे कनेक्शन दिले आहेत. तसेच सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसभर वीज पुरविण्यासाठी स्वतंत्र कृषी फिडर असा गुंतवणुकीचा पॅटर्न आणण्याचा प्रयत्न आहे. बेरोजगारी असतानाही शेतीसाठी मजूर मिळत नाही. यासाठी यांत्रिकीकरण व नवीन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. गटशेतीच्या माध्यमातून 20 एकरापर्यंत सर्व योजनांचा लाभ एकत्रित दिल्यास उत्पादन खर्च कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -


सरपंचांशी थेट संवाद
गावात परिवर्तन आणण्याची संधी सरपंच म्हणून मिळालेली आहे. ही संधी गावात परिवर्तन घडविण्यासोबतच आपले गाव आदर्श गाव करण्यासाठी वापरण्याचे आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, गावातील सरपंचांशी ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून संवाद साधण्यात येत आहे. आठ जिल्ह्यातील गावांच्या सरपंचांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती घेत असतानाच त्यांचे प्रश्न तत्काळ सुटावेत यासाठी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना ऑनलाईन सूचना देण्यात येत असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.सरपंच महापरिषदेला उपस्थित असणाऱ्या एक हजार सरपंचांचे मोबाईल दूरध्वनी घेऊन मला द्या. मी ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून सरपंचांशी संवाद साधेल, असेही त्यांनी जाहीर केले.

जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पहिल्याच वर्षी चार हजार गावामध्ये जन आंदोलन उभे झाले आहे. पाच वर्षात वीस हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात येणार असून शिवारातील पाणी शिवारात अडविणे व जमिनीत मुरविण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने उपाययोजना करण्यात आल्यामुळेच शेतीला शाश्वत सिंचनाचा लाभ मिळत असून उत्पादकताही वाढली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्मार्ट व्हिलेज संकल्पना साकारताना गावात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील, चांगले शिक्षण, आरोग्याच्या सुविधा आणि स्वच्छ गावासोबतच इंटरनेट कनेक्टीव्हीटीच्या माध्यमातून ई-लर्निंग व डिजीटलायजेशन करण्यासाठी सन 2018 पर्यंत राज्यातील 39 हजार ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होतील. प्रत्येक गावात आपले सरकार ई-सेवाकेंद्र सुरु करुन संपूर्ण व्यवहार कॅशविरहित होतील. 22 हजार केंद्रांना पॉश मशीन देण्यात आली असून एक वर्षात 30 हजार कृषी केंद्रांना ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षा कृषी माल खरेदी करणे शक्य होणार नाही. त्यासोबतच प्रत्येक गावात हवामान केंद्र सुरु केल्यामुळे शेतीच्या उत्पादन वाढविण्यासोबतच गाव परिवर्तनाच्या दिशेने सुरुवात होईल. सरपंचांनी यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकताही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

श्री. गडकरी म्हणाले, प्रयोगशिलता व यशस्विता याचे अनुकरण केले तर शेती व गाव बदलणे सहज शक्य असून यासाठी सरपंचांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. पाण्याचा प्रश्न सोडविल्याशिवाय शेतीचा विकास होऊ शकत नाही यासाठी जलयुक्त शिवार अभियान प्रत्येक गावात राबविणे आवश्यक आहे. राज्यातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी 55 टक्क्यापर्यंत सिंचन वाढविणे आवश्यक असून यापुढे राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर ब्रिज कम बंधारे बांधण्यात येऊन त्याद्वारे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता करुन देता येईल. महाराष्ट्रासह 11 राज्यामध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेती फायदेशीर होण्यासाठी खत, बियाणे तसेच वीज सुद्धा शेतकऱ्यांनी स्वत: तयार करावी, तसेच शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगताना श्री. गडकरी म्हणाले की, गाव हे परिवार म्हणून विकास करण्याचे जबाबदारी सरपंचांची आहे. पाण्यासाठी स्वयंपूर्ण उत्पादन वाढीसाठी अत्याधुनिक पद्धतीचा वापर व गावाची स्वच्छता यासाठी सरपंचांनी गावांना विश्वासात घेऊन कामाला सुरुवात करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी प्रोस मोटरचे प्रदीप धाडीवाल यांनी मार्गदर्शन केले. सरपंच महापरिषदेतील सरपंचांपैकी ड्रॉ पद्धतीने ट्रॅक्टरच्या मानकरी ठरलेल्या आमगावच्या श्रीमती सहारे यांना श्री.गडकरी व मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते ट्रॅक्टरची चावी देण्यात आली. ॲग्रोवन सरपंच महापरिषेदेच्या आयोजनाची भूमिका प्रास्ताविकात प्रतापराव पवार यांनी सांगितली. आभार आदिनाथ चव्हाण यांनी मानले तर सूत्रसंचालन किशोर गलांडे यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाऊर्जा पुस्तकाचे प्रकाशन झाले. विदर्भातील सुमारे एक हजार सरपंच तसेच कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.