मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली आहे, स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? – अजित पवार

मुंबई : राज्यात हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे शस्त्रक्रिया झाली तेव्हापासून ते जनतेसमोर आले नसल्याने, हिवाळी अधिवेशनात तरी ते उपस्थित राहणार काय? असा सवाल विरोधकांकडून माध्यमातून उपस्थित केला जात आहे.

चहापानाच्या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रपरिषद घेतली. मुख्यमंत्री चहापानाला गैरहजर असल्यामुळे, पत्रकारांनी अनेकवेळा मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबद्दल प्रश्न विचारला, पवार म्हणाले, ते त्यांच्या सोयीने विधीमंडळ कामकाजात सहभागी होणार आहेत. वेगवेगळ्या मार्गांनी त्याच आशयाचे प्रश्न आल्यानंतर मुख्यमंत्री अधिवेशनाला येणार आहेत, हे आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, असं बोलताच परिषदेत एकच हशा पिकला.

यानंतर पुढे पवार म्हणाले कि, मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी व्हिडीओ काॅलवर संपर्क केला आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली आहे. त्यांनी मला, थोरात, एकनाथ शिंदे, जयंत पाटील यांना उद्या 9 वाजता बैठक घ्यायला लावली आहे. आज त्यांनी आम्हाला वर्षावर देखील बोलावलं होतं सर्व मंत्र्यांना त्यांना सूचना दिल्या आहेत. त्यांची तब्येत चांगली आहे. दोन दिवसांपूर्वीच ते विधानभवनात येऊन गेेले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा