शिवजयंतीपूर्वी पूर्ण करा पुतळ्याचे काम – मराठा क्रांती मोर्चाची मागणी

औरंगाबादमधील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम कंत्राटदार वारंवार थांबवीत असून, या कामाची तपासणी करून शिवजयंती साजरी करण्यासाठी 19 फेब्रुवारी 2020 पर्यंत काम पूर्ण करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे महापौरांकडे करण्यात आली.

क्रांती चौकातील पूर्णाकृती पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यानुसार महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवून एक कोटी 84 लाख 53 हजार 572 रुपयांत हे काम गायत्री आर्किटेकला दिले आहे. याठिकाणी पुतळाही नवा बसविला जाणार असून, त्यावर एक कोटी 32 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र या कामाची निविदा अद्याप काढण्यात आलेले नाही. सध्या क्रांती चौकात पुतळ्यासाठी चबुतऱ्याचे काम सुरू आहे.

मात्र वारंवार हे काम थांबविले जात आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित करत मराठा क्रांती मोर्चा संघटना व शिवप्रेमींनी सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेतली. चबुतरा व पुतळा उभारण्याचे काम गतीने सुरू करण्याची त्यांनी मागणी केली. 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे. त्यापूर्वी चबुतऱ्याचे काम पूर्ण करून शिवरायांचा पुतळा येथे बसवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महापौरांनी काम गुणवत्तापूर्ण होईल, काम वेळेत पूर्ण झाले नाही तर पर्यायी व्यवस्था केली जाईल. त्यासाठी तुम्हीही पर्याय सुचवा, असे आवाहन शिष्टमंडळाला केले. यावेळी पृथ्वीराज पवार, राजेंद्र दाते पाटील, मनोज गायके, किशोर चव्हाण, माधवी पवार, सुकन्या भोसले, रेखा वहाटुळे रमेश गायकवाड आदींची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.