परमबीर सिंग यांच्यावरील तीन आरोपांची गोपनीय चौकशी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एसीबी म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तीन प्रकरणांची गोपनीय चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक बी आर घाडगे, पोलीस निरीक्षक अनुप डांगे आणि बुकी सोनू जालान यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर ही चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.

ही प्राथमिक स्वरूपाची चौकशी असते जी तीन महिन्यांच्या कालावधीत पार पडते. त्यानंतर जे पुरावे प्राथमिक चौकशीत मिळतात त्यानुसार खुली चौकशी किंवा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ठरते. सध्या तरी या तीनही प्रकरणामध्ये गोपनीय चौकशीला सुरुवात झाली असून लवकरच संबंधित तक्रारदारांना जबाबासाठी समन्स पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक बी आर घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. शिवाय अनुप डांगे यांनीही सिंग यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केलेत. तर सोनू जालान याने परमबीर यांनी आपल्याकडून बेकायदेशीर पैसे उकळल्याचा आरोप केला आहे.

क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंग यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले आहेत. 2018 मध्ये परमबीर सिंग यांनी मोक्का लावून माझ्याकडून 3 कोटी 45 लाख रुपये वसूल केले. याशिवाय, सोनू जालान याने पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे यांच्यावरही आरोप केले आहेत.

अनुप डांगे परमबीर सिंग यांच्यावर अंडरवर्ल्डशी मैत्री आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. अनुप डांगे यांच्या म्हणण्यानुसार, 2019 मध्ये एका पबवर छापा टाकताना पबचे मालक जीतू निवलानी यांनी परमबीरसिंग यांच्याशी संबंध असल्याची धमकी दिली होती.

विरोधात पुरेसे पुरावे नसले तरी केस तयार केली म्हणून संबंधित व्यावसायिकाविरुद्ध खटला भरण्यासाठी विभागीय कार्यवाही करत असताना आपल्याला निलंबित करण्यात आले होते, असा दावा अनुप डांगे यांनी केला होता. अनुप डांगे यांच्या दाव्यानुसार त्यांना पब मालकाच्या सांगण्यावरुन परमबीर सिंग यांनीच अडकवलं होतं.

परमबीर सिंह यांच्यासह माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा, ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी राजकुमार कोथमिरे आणि इतर पोलिसांवर विरारचे व्यावसायिक मयुरेश राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. 2017 मध्ये माझ्याविरोधात कोणतीही तक्रार नसताना मला खंडणी विरोधी पथकात तीन दिवस डांबून ठेवले आणि मारहाण केली. पोलिसांनी माझ्या घरात दरोडा टाकून दोन गाड्या चोरी केल्या, असा दावा मयुरेश राऊतांनी केला आहे. पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतलेल्या गाड्यांचा वापर मनसुख हिरेन सारख्या प्रकरणात होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

या तिघांच्याही तक्रारी पोलीस महासंचालक कार्यालयाला मिळल्यानंतर त्या एसीबीला पाठवण्यात आल्या होत्या आणि प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले होते, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा