पवारांच्या मताशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री सहमत; राठोडांच्या राजीनाम्यासाठी आग्रही

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड हे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. संजय राठोड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभय देणार की त्यांचा राजीनामा घेणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत सर्व प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. चौकशी सुरू असेपर्यंत राठोडांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात यावे असे मत पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याची माहिती कालच सूत्रांद्वारे मिळाली होती. त्यानंतर आता पवारांच्या नाराजीशी काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री सहमत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सह्याद्री अतिथिगृहावर कॅबिनेट बैठक बोलावली होती, त्या बैठकीनंतर वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहचले. काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री खासगीत संजय राठोड विषयावरून नाराज असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. संजय राठोड शिवसेनेचे मंत्री आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांनी निर्णय घ्यावा, असाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं दबाव निर्माण केला.

संजय राठोड प्रकरणी मुख्यमंत्री अधिवेशन सुरू होण्याआधी निर्णय घेतील, अशी अपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांनी व्यक्त केल्यानं राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आलं आहे. सह्याद्री अतिथिगृहावर मंत्रिमंडळाची बैठक झाली; पण या बैठकीत संजय राठोड यांच्याविषयी कोणतीच चर्चा झालेली नाही. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते संजय राठोड प्रकरणात शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.