InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: भारतीय कुस्तीपटूंनी आज मिळवली चार पदके

गोल्ड कोस्ट। भारताच्या कुस्तीपटूंनी ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आजचा दिवस गाजवला आहे. आज भारताला कुस्तीमध्ये ४ पदके मिळाली आहेत. यात १ सुवर्णपदक, २ रौप्य आणि १ कांस्यपदक यांचा समावेश आहे.

आज भारताला कुस्तीमध्ये बजरंग पुनियाने सुवर्णपदक मिळवून दिले. तर मौसम खत्री आणि पूजा धंडाने रौप्य आणि दिव्या काकरणने कांस्यपदक मिळवले.

यामुळे भारताच्या खात्यात आता ४२ पदके झाली असून यात १७ सुवर्णपदके, ११ रौप्यपदके आणि १४ कांस्यपदकांचा समावेश आहे.

अशी मिळवली आज कुस्तीपटूंनी पदके:

बजरंग पुनिया: बजरंगने भारताला आजच्या दिवसातील कुस्तीमध्ये पहिले तर एकूण तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने ६५ किलो फ्रीस्टाईल प्रकारात अशी कामगिरी केली. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात बजरंग पुनियाने वेल्सच्या केन चॅरिगचा १०-० असा पराभव केला.

मौसम खत्री: मौसमने ९७ किलो फ्रीस्टाईल प्रकारात रौप्य पदक मिळवले आहे. त्याला अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मार्टिन इरॅस्मसने २-१२ च्या फरकाने पराभूत केले. या पराभवामुळे त्याला रौप्य पदावर समाधान मानावे लागले.

पूजा धंडा: राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये पूजाने महिलांच्या ५७ किलो फ्रीस्टाईल प्रकारात रौप्य पदक मिळवले आहे. तिला अटीतटीच्या अंतिम सामन्यात नायजेरियाच्या ओडिनयो अडीकुरोये विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. तिला अडीकुरोयेने ७-५ फरकाने पराभूत केले.

दिव्या काकरण: आजच्या दिवसातील कुस्तीमध्ये चौथे पदक दिव्याने मिळवून दिले. तिने महिलांच्या ६८ किलो फ्रीस्टाईल प्रकारात अशी कामगिरी केली.

ती आज उपांत्य सामन्यात नायजेरियाच्या ब्लेसिंग ओबोरुडुडु विरुद्ध पराभूत झाली होती, त्यामुळे तिला आज बांग्लादेशच्या शेरिन सुलताना विरुद्ध कांस्यपदकासाठी सामना खेळावा लागला. या सामन्यात दिव्याने सुलताना विरुद्ध ४-० अशा फरकाने विजय मिळवला आणि भारताला कांस्यपदक मिळवून दिले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.