‘प्रवीण दरेकर आणि मी संताजी, धनाजीची जोडी, सरकारही या जोडीला घाबरतं’

मुंबई : राज्यात जिल्हा बँकांच्या निवडणुकांवरून राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच मुंबै बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती करत भाजपचे असलेले अध्यक्षपद आपल्याकडे खेचले. या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे. तर, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मात्र पराभव स्वीकारावा लागला.

भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराला समसमान मत पडल्यामुळे ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यात भाजपचे उमेदवार विठ्ठल भोसले यांची उपाध्यक्षपदासाठी निवड झाली. युती करूनही उपाध्यक्षपद हातातून गेल्याने हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. मात्र यानंतर राष्ट्रवादीने शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम केला अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेळीमुळे मुंबै बँकेवरील प्रवीण दरेकरांचं वर्चस्व संपुष्टात आलं.

तर अध्यक्षपद निवडणुकीत प्रसाद लाड यांचा पराभव झाला. त्यांनंतर प्रसाद लाड यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस हे आमचे कुटुंब प्रमुख, आमचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नाराज होऊ शकत नाही. प्रवीण दरेकर आणि मी संताजी, धनाजीची जोडी महाराष्ट्राला मिळाली आहे. सरकारही या जोडीला घाबरतं, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिलीय.

तसेच सरकारही आम्ही काय रिअॅक्शन करु याला घाबरतं. दरेकर यांच्यावर नाराजीचा प्रश्नच येत नाही. कालच्या निवडणुकीत गद्दारी ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि महाविकास आघाडीनं केली आहे, असा आरोप प्रसाद लाड यांनी केलाय. मुंबई बँक निवडणूक दरेकर यांच्या नेतृत्वाखाली लढले आणि त्यांचा घात केला. घात करुन निवडणूक ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, असंही लाड म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा