दहावीच्या परीक्षेबाबत निर्णय पुढील आठवड्यात लागणार: अजित पवार

परीक्षेविना विद्यार्थ्यांना उत्तीर्ण कसे करू शकता? कोरोनाचे कारण पुढे करून दहावीसारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षाची परीक्षा रद्द कशी केली जाऊ शकते, असे उच्च न्यायलायने राज्य सरकारला गुरुवारी फटकारले होते. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पालकांना विद्यार्थ्यांबाबत काळजी वाटणार नाही आणि न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही, अशा पद्धतीने निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली आहे.

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘‘उच्च न्यायालयाने व्यक्त केलेले मत अद्याप अभ्यासले नाही. याबाबत पुढील आठवड्यात मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे महाअधिवक्ता, शिक्षण सचिव आणि अन्य संबंधित मंत्री, अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला जाईल. पालकांना त्यांच्या पाल्यांबद्दल चिंता वाटणार नाही आणि न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही, असा निर्णय घेतला जाईल.’’

“गेल्या वर्षभरापासून प्रत्यक्ष शाळा सुरू नाहीत, तरी देखील शाळांकडून १०० टक्के  शुल्क आकारण्यात येत आहे. कोरोनामुळे शैक्षणिक संस्थाही अडचणीत आल्या आहेत. मात्र, संस्थांनी अडचणी पुढे करून पालकांकडून शुल्क घेणे चुकीचे आहे. याबाबत शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय संस्थांना बंधनकारक आहे,” असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा