InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

डान्स बारच्या निर्णयावर स्व. आबांना लिहिलेले एक संवेदनशील पत्र

सद्या डान्स बार सुरू करण्याच्या निर्णयावर वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या डान्स बार सुरू करण्याच्या निर्णयावर स्व. आर.आर. पाटील आबांना राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसचा प्रदेश सरचिटणीस धीरज बच्छाव यांनी लिहिलेले संवेदनशील पत्र सोशल सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सगळीकडे चर्चेचा विषय बनले आहे.

काय आहे पत्रात :- 

प्रिय आबा, आज तुम्ही आमच्यात नसलात तरीही तुमचे तत्व, तुम्ही जनतेसाठी अगदी निस्वार्थ वृत्तीने केलेलं कार्य या सगळ्यातून तुम्ही आमच्या पाठीशी आहात. तुम्ही खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्राचे आबा झालात. तुमच्याशी खूप बोलावंसं वाटलं खरं तर आज. तसं म्हटलं तर अनेकांच्या दृष्टीने हा मुद्दा फार विशेष नाहीये; परंतु तुमच्या पाऊलावर पाऊल ठेवणाऱ्या हरएक सुजाण मनासाठी हा मुद्दा अगदी ”विशेष”च्याही पलीकडचा आहे. माझ्यासाठीही तो तितकाच महत्वाचा आहे. सन २००५ साली तुम्ही जेव्हा आटापिटा करून, कितीतरी विरोध झुगारून डान्सबारवर आणलेली बंदी आज मात्र मोकळा श्वास घेण्यासाठी पुन्हा एकदा मुक्त झालीये. सुप्रीम कोर्टाने ती बंदी हटवली.

ज्यावेळी ह्या सगळ्या अनैतिकतेच्या कचाट्यात ह्या महाराष्ट्रातील अनेक मंडळी बारच्या पायथ्याशी लोळण घालत पहुडलेली असायची तेव्हा अनेक घरातील संसार उद्धस्व होत असल्याचे तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिले होते. तुमच्या नजरेला संवदेनशीलतेची झालर होती आबा म्हणून तुम्ही हे सारं बंद पाडत ह्या सगळ्या पीडित कुटुंबियांना पुन्हा एकदा जगण्याची नवी दिशा दिली होती. अनेक महिलांनी तुमचे मनोमन आभार मानले होते आणि खऱ्या अर्थाने त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. ह्या श्वासातली विसंगती आज जाणवतेय ना आबा?

भीती कसली वाटते माहितीये? ह्या बंदीला विरोध दर्शवून तुमचं अस्तित्व तर नाकारलं जाणार नाही ना? तुम्ही न्याय केला होता. आज तो ”न्याय” सुप्रीम कोर्टात तग धरू शकला नाही.

त्या न्यायाचा कणा मोडला गेला, याला जबाबदार नेमके कोणास धरायचे? आज ”डान्सबारवरील बंदीला नकार” ही ओळ वाचताना तुमचे प्रामाणिक प्रयत्न, अनेकांना न्याय मिळावा म्हणून तुमची धडपड एका क्षणात डोळ्यासमोर उभी ठाकते आणि जणू काही प्रश्न विचारते. आता ह्या सगळ्याविरोधात पुन्हा लढा कोण देणार? आम्ही माना खाली घालून केवळ विचार करतोय.

ह्या दूषित निर्णयाने तुमच्या मनाला काय वाटलं याची केवळ कल्पनाच करवते असे म्हटले आहे. पत्रात पुढे म्हटले आहे की, आपल्या राज्यातल्या तमाम आयाबहिणींसाठी तुम्ही केवळ हिरो नव्हते तर एका देवदूतासारखे होते. सध्या एकीकडे स्त्रियांना आदर देण्याच्या केवळ गोष्टी करायच्या अन दुसरीकडे अश्लील, अवैध मार्गाने त्यांच्या देहांची लक्तरं उघडी करत आनंद लुटण्यात धन्यता मानणाऱ्या नराधमांना तुमच्या दृष्टीचं ह्या जन्मात तरी दर्शन घडेल? इथूनपुढे पेपरमध्ये पुन्हा बातम्या छापून येतील, डान्सबारमधून मद्यप्राशन केलेल्या तरुणांचा घरी परतताना अपघात डान्सबारमध्ये नर्तिकेसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे अमुक तमुक व्यक्तीवर गुन्हा दाखल डान्सबारमध्ये सापडला ड्रग्जचा साठा.

महाराष्ट्रावर पुन्हा एकदा डान्सबारचं संकट टीव्ही बघतानाही याच आणि अशा स्वरूपाच्या अनेक मन छिन्नविछिन्न करणाऱ्या बातम्या कानांवर पडणार. सुरुवातीला चीड येऊन कदाचित कानाचे पडदे फाटतीलही; पण या गोष्टीची सवय व्हायला महाराष्ट्राला वेळ लागणार नाही. सामान्य माणसाला ही सवय करून घेण्याखेरीज इतर उपाय शोधण्यास मदत कोण करेल? ज्यांना ही घाण आपल्या आसपासही नकोय ते सारेच आज तुमची आठवण काढतायत आबा.

तुम्ही ऐकताय ना? निर्णय भले सुप्रीम कोर्टाचा असला तरीही सरकार ही लढाई देण्यात कमी पडलं का? एकीकडे लोकसभा निवडणुका एन तोंडावर आलेल्या असताना ही नेमकी कोणत्या प्रकारची राजकीय खेळी असावी असे अनेक प्रश्न मनाला पडतात इतकंच! इतक्या संवेदनशील मुद्द्याला राजकीय चष्म्यातून पाहणं जनसामान्यांच्या जीवावर बेतू शकतं इतकं साधं समीकरण आजपर्यंत केवळ तुम्हालाच समजलं.

असा विचार सद्यस्थितीत कोणताही राजकीय नेता का करत नाही याच आश्चर्य वाटतं आणि त्रासही होतो. बारबालांवर नोटा उधळता येणार नाही; पण टीप मात्र देता येईल ह्या वाक्यातील धूसर सीमारेषा पुन्हा एकदा महाराष्ट्राला त्या गटारीत लोळवेल याची भीती अंगावर काटा बनून क्षणोक्षणी येईल.आज शिक्षण देणाऱ्या विद्येच्या मंदिरापासून हे डान्सबार अगदी एक किलोमीटर अंतराच्या आतही दिमाखात सजतील कारण तसा ग्रीन सिग्नलच देऊन टाकलाय सुप्रीम कोर्टानं. थोडक्यात गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा एकदा नव्याने सज्ज होईल. प्राणघातक हल्ले, संस्कृतीकडून विकृतीकडे होणारी वाटचाल, गैरमार्गाने पैसे कमवण्याचे अड्डे जागोजागी स्थिरावतील.

यातूनही गुन्हेगार आरामात सुटून बाहेर पडतील.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply