Devendra Fadnavis | “…पण काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात”; फडणवीसांचा विरोधकांना खोचक टोला

Devendra Fadnavis | मुंबई : सध्या राज्यात होळी, धुलिवंदनाच्या निमित्ताने सामान्य राज्याभरात धुळवड साजरी केली जात आहे. तसेच राजकीय नेत्यांमध्येही आज धुळवड साजरी करताना आनंद घेत असल्याचं दिसून येत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या, नेत्यांच्या घरी, कार्यालयांमध्ये धुलिवंदन साजरं केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर धुलिवंदनच्या रंगांप्रमाणेच राजकीय रंगही उधळले गेले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुंबईत भाजप कार्यालयात धुलिवंदन साजरं केलं. यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना राजकीय टोलेबाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

“आम्ही त्या सगळ्यांना माफ केलंय”

“आम्ही विधानसभेत सांगितलं होतं की खूप लोकांनी आम्हाला त्रास दिलाय. त्या सगळ्यांचा आम्ही बदला घेऊ. आता आमचा बदला हा आहे की आम्ही त्या सगळ्यांना माफ केलं. आमच्या मनात या कुणाबद्दल कोणतीही कटुता नाही”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

“असा नशा करण्यापेक्षा भक्तीचा, संगीताचा, कामाचा नशा करावा”

“अनेक वेळा होळीला आमच्या काही मित्रांना खोटं सांगून. भांग वगैरे पाजून दिली. त्यानंतर दिवसभर त्यांचं जे काही चाललं होतं, कुणी गाणं म्हणत होतं. कुणी रडत होतं. हे सगळं पाहून मजा आली. पण असा नशा करण्यापेक्षा भक्तीचा, संगीताचा, कामाचा नशा करावा”, अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

“…पण काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात” (Devendra Fadnavis criticize on opposition)

“मला एक-दोन लोकांनाच सल्ला द्यायचाय की उत्तर भारतात होळीच्या दिवशी शिमगा करण्याची पद्धत आहे. आपल्याकडेही शिमगा करण्याची पद्धत आहे. पण काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात. मला त्यांना सांगायचंय की एखादा दिवस ठीक आहे. पण उरलेले ३६४ दिवस आपण सभ्य माणसांसारखं वागण्याचा प्रयत्न केला तर उत्तम आहे”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना खोचक टोला लगावला.

“अर्थसंकल्पात प्रत्येकाचे रंग दिसतील” 

“ज्या प्रकारे वेगवेगळ्या रंगांनी ही होळी साजरी केली जाते, त्याचप्रकारे आमचा अर्थसंकल्पही वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगला असेल. सगळ्यांना त्यांचे रंग त्यात पाहायला मिळतील. सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळेल”, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.