खनिज व खाणकाम क्षेत्रातील उद्योगांसाठी नवे धोरण तयार करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 10 : खनिज व खाणकाम क्षेत्रातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासोबत या क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या भरपूर संधी व गुंतवणुकीला चालना मिळावी यासाठी राज्याचे नवीन सर्वंकष खनिज धोरण तयार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

खनिज व खाणकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मिनकॉन कॉनक्लेव्ह- 2019 या उद्योजकांच्या राष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ ‘एमएसएमसी’चे अध्यक्ष आशिष जयस्वाल, व्यवस्थापकीय संचालक एस. राममूर्ती, देवेंद्र पारेख, सुधीर पालिवाल तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

उद्योग आणि खनिकर्म विभाग, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ ‘एमएसएमसी’, विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद) यांच्या सहकार्याने हॉटेल सेंटर पॉईंट येथे दोन दिवसीय ‘मिनकॉन कॉनक्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ‘एमएसएमसी’ आणि खनिज क्षेत्रातील विविध उद्योग समुहांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आले.

Loading...

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, खनिज आणि खाण क्षेत्रातील भविष्यातील वाटचालीबाबत विचार मंथन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली मिनकॉन 2019 ही परिषद महत्वपूर्ण आहे. खनिज-उद्योग क्षेत्रात विपुल संधी उपलब्ध असून या परिषदेच्या आयोजनामुळे या क्षेत्रातील संधींसंदर्भात साकल्याने विचारमंथन होईल. खनिज संपदेच्याबाबतीत विदर्भ संपन्न प्रदेश आहे. गौण खनिज आणि मुख्य खनिजांपासून शासनाला महसूल प्राप्त होतो. खनिजांवर आधारित प्रक्रिया उद्योग महत्वपूर्ण असून या क्षेत्रातील उद्योगांना वीजदरात सवलत देण्यात येत आहे. राज्यात खनिज उद्योग क्षेत्रात वाढीच्या विपुल संधी उपलब्ध आहेत. खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टर उभारणीवर व ज्याठिकाणी खनिज संपदा आढळते तेथेच त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग व मूल्यसंवर्धन उद्योग उभारण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

खनिजांवर आधारित प्रक्रिया उद्योगांबाबत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या क्षेत्रातील उद्योग उभे करण्यासाठी विविध सुविधा देऊन उद्योगांना बळकटी देण्यात येणार आहे. अहेरी व जिवती येथे सिमेंट उद्योग, गडचिरोलीत स्टील प्रकल्प, भंडाऱ्यात मँगनीज प्रकल्प असे विविध खनिजांवर आधारित उद्योग विदर्भातील विविध क्षेत्रात प्रस्तावित आहेत.

खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीबरोबरच पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा विचारही करणे गरजेचे आहे. राज्यात विविध क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या उभारणीची कामे वेगात सुरु आहेत. या कामांबरोबरच अन्य कामासाठीही वाळू अत्यंत महत्वपूर्ण घटक आहे. खनिज व खाणकाम क्षेत्रातील विविध प्रक्रियासाठी पर्यावरणाचे भान ठेवणे अत्यंत गरजेचे असून पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करतच सातत्यपूर्ण व शाश्वत कामे या क्षेत्रात करावी लागणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ ‘एमएसएमसी’, विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद) तसेच या क्षेत्रातील विविध संस्थांनी राज्याचे नवीन खनिज व खाणकाम धोरणासंबंधी मसुदा तयार करुन जूनपूर्वी सादर करावा. या धोरणामध्ये मिनकॉन या परिषदेतील सूचनांचाही समावेश करावा. शासनातर्फे खनिज व खाणकाम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी या क्षेत्रातील उद्योजकांना दिली.

श्री. जयस्वाल म्हणाले, वने, पर्यटन आणि खनिज संपदा ही विदर्भाची बलस्थाने असून खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीसाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. या क्षेत्रातील उद्योगांना अधिक सुविधा व सवलती उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. खनिज क्षेत्रातील प्रक्रिया उद्योग व मूल्यवर्धीत उद्योग विदर्भातच निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. या क्षेत्रातील उद्योगांमुळे रोजगार निर्मितीही होणार असून या क्षेत्रात गुंतवणूक वाढणार आहे. कोळशाचे उत्पादन विदर्भात मोठ्या प्रमाणात होते. या क्षेत्रात आगामी काळात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. खनिजाच्या रॉयल्टीतून मिळणाऱ्या निधीतून काही भाग संबंधित जिल्ह्याच्या विकासासाठी वापरण्याचे धोरण त्या जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरत आहे.

श्री.पारेख म्हणाले, आपला देश विविध खनिज संपत्तीचे विपुल भांडार असून या क्षेत्रातील उद्योगांमध्ये वाढीच्या आणि विकासाच्या संधी आहेत. या क्षेत्रातील उद्योगात आता प्रक्रिया उद्योग आणि मूल्यसंवर्धन उद्योगांची वाढ होणे गरजेचे आहे. यातून रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल, ‘मिनकॉन’ कॉनक्लेव्हद्वारे खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीसाठी सर्वांगीण विचारमंथन झाल्याचे श्री. पारेख यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.