“अजित पवार यांचा गजनी झालाय का?,गजनी सर्व काही विसरायचा”; भाजपची सडकून टीका

मुंबई : “राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सरकार मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे. राज्य सरकार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची मदत करणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ही मदत केली जाईल,” असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. परंतू, आता पावसाळा सुरू झाला तरी शेतकऱ्यांना योग्य ती मदत न पोहोचल्यानं भाजपचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी अजित पवारांवर कडाडून टीका केली आहे.

“दोन लाखांपर्यंत कर्जाचे वन टाइम सेटलमेंट करू आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन म्हणून देऊ, अशी घोषणा करणारे आणि विधानसभेत टाळ्या मिळवणारे अर्थमंत्री अजित पवार यांचा गजनी झाला आहे का?”, असा सवाल अनिल बोंडे यांनी विचारला आहे. राज्यातील ठाकरे सरकारने पीक विमा कंपन्यांशी करार करताना निकष बदलविल्यामुळे शेतकऱ्यांचे 4 हजार 234 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा आरोप माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे.

“राज्याच्या कृषीमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अथवा मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. तुम्हाला गजनी चित्रपट आठवतो का? गजनी सर्व काही विसरायचा, अशा शब्दात त्यांनी अजित पवारांची खिल्ली उडवली. 2019 च्या खरीप हंगामामध्ये 1 कोटी 28 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. तेव्हा तब्बल 85 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी 5 हजार 795 कोटी रुपये मिळाले होते,” असं देखील बोंडे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा