काही नेते पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी? पवारांचा राणेंना टोला

केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले नारायण राणे यांनी अलीकडंच कोकणातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. हा दौरा राणेंच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळं गाजत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची चर्चा सुरू आहे. याबाबतची क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. चिपळूणमधील पाहणीच्या वेळी एकही सरकारी अधिकारी सोबत नसल्यानं नारायणे राणे चांगलेच भडकले होते. सुरुवातीला त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून झापले.

पुढे जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत सांगू पाहत असताना, ‘सीएम, बीएम गेला उडत’ असं म्हणत राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना खडसावलं. ‘मी इथं बाजारपेठेत उभा आहे. तुमचा एकही माणूस आमच्यासोबत नाही,’ असं राणे म्हणाले.यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. काही नेते पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. जिल्हाधिकारी कुठे आहेत? तहसीलदार कुठे आहेत? विचारत आहेत. हे लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी? असा टोमणा पवारांनी नाव न घेता नारायण राणे यांना मारला.

पुढे राणेंवर टीका करताना पवार म्हणालेत, “यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपर्यंत अनेक मुख्यमंत्री झालेत. मात्र अशा प्रकारची भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी वापरली नाही. तुम्ही पूरग्रस्त भागाची पाहणी करायला आलात की मामलेदार, जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी करायला? हे लोक अधिकाऱ्यांना पाहण्यासाठी दौरा करतात का?” असा हल्ला अजित पवार यांनी केला.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा