Eknath Khadse | “वेगळ्या विदर्भासाठी लढा देणारे नेते…” ; एकनाथ खडसेंची फडणवीसांना टोला

Eknath Khadse | नागपूर : राष्ट्रवादी काँग्रसेस पक्षाचे विधान परिषद आमदार एकनाथ खडसे यांनी २६० अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावात सहभाग घेऊन विदर्भ संदर्भातील विविध महत्वपूर्ण विषयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. “दोन वर्षानंतर यंदा विदर्भात अधिवेशन होत आहे. १९६० साली विदर्भ करार झाला तेव्हापासून ६२ वर्ष झाली याकाळात विदर्भ कराराचे किती पालन झाले, याचा खुलासा झाला पाहिजे. विदर्भाची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. ही परिस्थिती सुधारण्याची भूमिका सरकार घेणार की नाही, असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला. विदर्भात राबविण्यात आलेले सिंचन प्रकल्पाची स्थिती अत्यंत बिकट आहे. अनेक प्रकल्प रखडून आहेत. हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाले असते तर विदर्भाचे चित्र बदलले असते, असेही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील इतर तीर्थक्षेत्रांचा विकास होतो. मात्र विदर्भातील तीर्थक्षेत्रात कोणतीही हालचाल होत नाही. याकडे सरकार का लक्ष देत नाही. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. या शेतकऱ्यांसाठी अनेक अनुदान देऊनही ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. विदर्भातील सारे प्रश्न एका दिवसात सोडणारे नाही. मात्र देशाला स्वातंत्र मिळून सत्तर वर्ष होऊन गेली, महाराष्ट्राची स्थापना होऊन साठ वर्ष होऊन गेली तरी महाराष्ट्रात विदर्भ आहे का हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे विदर्भ वेगळा होण्याची भूमिका का मनात येते याचा विचार करायला हवा. विदर्भ वेगळा करण्याची मागणी का येत तर या भागावर होणारा अन्याय याला कराणीभूत आहे. या वेगळ्या विदर्भासाठी लढा देणारे नेते सत्तेत आल्यावर त्यांची भाषण आणि भूमिका का विसरले, असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना लगावला.

एकनाथ खडसे म्हणाले, “समृद्धी मार्गाचे कौतुक करावेच लागेल. या महामार्गासाठी पैसा उभारला जातो. मुंबई, ठाणे सारख्या शहरात मोठे प्रकल्प राबविण्यात येतात त्यासाठी पैसा उभारला जातो. नागपूरमध्ये एक मेट्रो प्रकल्प केला पण विदर्भात केवळ नागपूर येथे एक प्रकल्प राबवून संपूर्ण विदर्भाचे चित्र बदलणार नाही असे ते म्हणाले. मुंबई ठाणे पुणे,औरंगाबाद अशा शहरासाठी कर्ज काढले जाते. यापैकी छोटा हिस्सा विदर्भासाठी खर्च केला असता तर इथले चित्र बदलले असते.”

आज कापसाचे भाव कोसळले असून १५ हजार क्विंटलचा कापूस साडेसहा हजारावर आला यातून कापूस उत्पादक शेतकऱ्यावर काय संकट आले यावर विदर्भात अधिवेशन होतानादेखील एकदातरी यावर चर्चा झाली का अशी खंत त्यांनी व्यक्त केली. विदर्भात उद्योग येण्यासाठी आकर्षक पॅकेज दिले पाहीजे. विदर्भात साखर कारखाने, दूध उत्पादक संघ चालत का नाही याचा विचार करायला हवा. विदर्भात संत्रा उत्पादक, कापूस उत्पादक, भंडारातील गोड्या पाण्याच्या झिंगा उत्पादकासाठी ठोस आणि कायमस्वरूपी प्रकल्प का आणले नाही, असा सवाल खडसे यांनी सत्ताधाऱ्यांना केला.

विदर्भाच्या लोकांसाठी रोजगार, नोकऱ्या उपलब्ध नाहीत तर या भागातील तरूण नक्षलवादी मार्गाकडे वळतो यात आश्चर्य वाटायचे कारण नाही. मोठ्या रस्त्यांची चर्चा करताना ग्रामीण भागातील रस्त्याची परिस्थिती काय याचा विचार करायला हवा. अधिवेशन विदर्भात होत असताना एक काळ होता जिथे महिनाभर अधिवेशन चालायचे आता तीन आठवडे करण्याची मागणी केली तरी त्यात कपात केली जाते. या अधिवेशन काळात विदर्भावर किती चर्चा झाली याची सरासरी काढली तर ती जमेची बाजू अजिबात होणार नाही. त्यामुळे आतापर्यंत जे झाले ते बाजूला ठेवून विदर्भावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणे जरूरी आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी होणे हेच आपल्या सर्वांचे अपयश आहे त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.