Eknath Khadse । शिंदे-फडणवीस सरकारचा एकनाथ खडसेंना दणका; मध्यरात्रीच काढली वाय दर्जाची सुरक्षा 

जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) आक्रमक झाले. संघात झालेल्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी एकनाथ खडसे जळगाव पोलीस स्टेशनमध्ये आंदोलनाला बसले. मात्र, गुन्हा दाखल होत नसल्याने खडसेंनी अधिकाऱ्याला चक्क हात जोडून अधिकाऱ्याला उद्देशून मी तुमच्या पाया पडतो गुन्हा दाखल करा, अशी विनंती केली. एकनाथ खडसे यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्याबाहेर गुरुवारी रात्रभर ठिय्या आंदोलन केले. खडसेंच्या या आंदोलनाची बरीच चर्चा झाली. अशातच त्यांना शिंदे-फडणवीस सरकारने दणका दिला आहे.

एकनाथ खडसे यांना दिलेले विशेष सुरक्षा कवच गृह खात्याने काढून घेतले आहे. त्यांना १९९१ पासून ही सुरक्षा पुरवली जात होती. याबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, मी जेव्हा पोलिस ठाण्यासमोर आंदोलनाला बसलो, त्यावेळी मला संरक्षणासाठी देण्यात आलेले पोलिसही माझ्याबरोबर होते. मात्र, मध्यरात्री तीनच्या सुमारास वायरलेस गाडी आली आणि माझं पोलिस संरक्षण काढून घेण्यात आले. माझ्याबरोबर असणाऱ्या पोलिसांनी सांगितले की आम्ही सकाळी येतो, त्यावेळी त्यांना तातडीने माझे संरक्षण काढल्याचे सांगून बोलावले. काढलं तर चांगली गोष्ट आहे, मी पोलिस संरक्षण मागितलेच नव्हते. धमकी आल्यामुळे सरकारनेच मला ते संरक्षण दिले होते. अजूनही जीवाला धोका असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण?

जळगाव जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांची फिर्याद पोलिसांनी घेतली आहे. जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष मंदाकिनी खडसे यांनी एक आठवड्यापूर्वी मालाची तपासणी केली. यावेळी दूध संघातून १४ टन म्हणजे ८० लाखांचे पांढरे लोणी बाहेरच्या जिल्ह्यांत पाठविण्याचे भासविण्यात आले. प्रत्यक्षात माल बाहेर गेल्याबद्दलच्या नोंदी आढळून आली नाही. तर दूधाच्या पावडरच्या साठ्यात ३० ते ३५ लाख रुपये किंमतीच्या ३६० बॅगची तफावत आढळून आली आहे. असे एकंदरीत १ कोटी १५ लाख रुपयांच्या मालाची चोरी झाल्याचे तपासणीतून समोर आले. यानंतर मंदाकिनी खडसे यांनी दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची सूचना केली. पण दूस संघाची तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली नाही आणि गुन्हाही नोंदवला नाही. हा प्रकार त्यांनी पती एकनाथ खडसे यांच्या निदर्शनास आणून दिला.

यानंतर एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हे जळगाव जिल्हा पोलीस ठाण्यात जाऊन धडकले. दूध संघातील मालाच्या चोरी प्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी, अशी मागणी खडसेंनी केली. आर्थिक गुन्ह्याचा प्रकार आहे. त्यामुळे खडसेंनी आपली तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे करावी, असे पोलिसांनी सांगितले. पण हा आर्थिक गुन्हा नसून गोदामातून माल चोरीला गेला आहे. यात कोणाचा हात आहे, त्यांची नावेही खडसेंनी पोलिसांना दिली.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.