Eknath Shinde | “आत्मविश्वास होता म्हणून…”, ज्योतिषाकडे जाण्यावरुन शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

Eknath Shinde | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काल शिर्डी दौऱ्यावर गेले होते. यावेळी ते ज्योतिषाकडे देखील गेले. यावरुन राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्षातील नेते टीका करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना सरकार कधी पडणार, असा प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना त्यांनी शिंदेंना जोरदार टोला लगावला आहे. यालाच आता मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आत्मविश्वास होता, म्हणून तर 50 आमदारांसोबत 13 खासदार माझ्यासोबत आले. महाविकासआघाडीचं सरकार कोणासोबत काम करत होतं? कुणासाठी सरकार चालत होतं? हे सर्वसामान्यांना मान्य नव्हतं, म्हणून सर्वसामान्यांचं सरकार आम्ही स्थापन केलं आहे. 30 जूनलाच आम्ही ज्यांना हात दाखवायचा त्यांना दाखवला आहे. चांगला हात दाखवला आहे.’ आम्ही जे करतो ते उघडपणे करतो, जे लपून छपून करतात त्यांची काळजी करा, असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

दोन महिन्यात राज्य सरकार कोसळणार असल्याचं भाकीत केलं जात आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे?, असा सवाल शरद पवारांना करण्यात आला होता. यावर उत्तर देत असताना मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे सरकार कधी कोसळेल हे मी सांगू शकणार नाही, माझा त्यावर विश्वास नाही, मी दौरा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही, हल्ली आपण नवीन गोष्टी पाहात आहोत, महाराष्ट्रात जे कधी घडलं नव्हतं, ते घडत आहे, ठिक आहे, असं शरद पवार म्हणाले.

यादरम्यान, कार्यक्रम बंद करून शिर्डीला जाणं, त्यानंतर दुसरीकडे जाऊन हात दाखवणं या गोष्टी महाराष्ट्राला नवीन आहे. हे राज्य पुरोगामी आहे, विज्ञानाचा पुरस्कार करणारं राज्य म्हणून लौकीक आहे, त्या राज्यात या गोष्टी पाहायला मिळत आहेत, आत्मविश्वासाला धक्का बसतो तेव्हा लोक अशा गोष्टीकडे जातात, ज्योतिषाला हात दाखवतात, असं देखील पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.