Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंनी सहावीतील शेतकरी पुत्राच्या ‘त्या’ पत्राची घेतली दखल

हिंगोली : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे उभे पिक नष्ट झाले. घोषणाबाज सरकारने जरी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली असली. तरी शेतकऱ्यांना फुटकी कवडी देखील मिळाली नाही. राजकीय उदासीनतेपोटी शेतकऱ्यांच्या मुलांना देखील याचा सामना करावा लागत आहे. हिंगोली जिल्ह्यातील सहावीत शिकणाऱ्या प्रताप नावाच्या कावरखे शेतकरी पुत्राने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. या पत्रावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडून शेतकरी पुत्राच्या पत्राची दखल 

एकनाथ संभाजी शिंदे यांच्याकडून प्रतापने लिहिलेल्या पत्राची दखल घेतली असून, मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर प्रशासन प्रतापच्या घरी पोहोचलं असल्याची माहीती समोर येतं आहे. प्रतापच्या शिक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे. त्याचबरोबर प्रताप आणि त्याच्या कुटुंबीयांना घरकूलही दिलं जाणार असल्याचं समजतं आहे.

प्रतापने काय लिहिले होते पत्रात ?

गेले काही दिवस राज्यात परतीचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन कापणीचा हंगाम सुरु आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन कापले, पण सततच्या पावसामुळे ते खराब झाले. काही सोयाबीन वाहून गेले. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. दरम्यान सहावीतील विद्यार्थी प्रताप कावरखे याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे त्याची परिस्थिती व आई वडीलांची संसाराचा गाडा चालवण्यासाठी सुरु असलेली कैफियत मांडली आहे.

प्रताप कावरखे याचे पत्र त्याच्याच शब्दात- 

एकनाथ शिंदे

मंत्री सायेब मुंबई

माये बाबा शेती करतात आमच्या घरी शेती कमी असे बाबा म्हनतात, मी बाबाले म्हणल की मले गूपचूप खायले पैसे दया कि ते माया संग भांडन करतात. म्हनतात यावर्षी सगली सोयाबीण गेले वावर इकतो देतो तूले दहा रुपये. आईन दसऱ्याले पुरणाच्या पोळ्या पण नाही केल्या. आई म्हणे इथं विष खायले पैसे नाहीत. वावरातील सोयाबीन गेले. माये बाबा दुसयाच्या कामाला जातात मी आईला म्हणल की आपल्याने दीवाली ले पोळ्या कर ती म्हणे की बॅंकेत अनुदान आलं की करू पोळ्या. सायेब आमच्या घरी सनाच्या पोळ्या नाही, मले गुपचूपसाठी पैसे नाहीत. आम्हाले घर नाही. आम्हाले काहीच नाही. मी बाबा संग भांडन केल की ती आई म्हणे आपल्या जवळच्या जयपूर गावात शेतकऱ्याले त्याच्या पोरान पेसे मागितले म्हणून त्याने फासी घेतली. आता ती बाबाले पेसे नाही मागत सायेब. आमच घर पाहा की तुम्ही, आनूदानचे पैसे लवकर दया मग दीवाळीले आई पोळ्या करते तुम्ही या पोळ्या खायले सायेब.

तुमचा आणी बाबाचा लाडका

प्रताप कावरखे
वर्ग 6 वा जी.प शाला गोरेगाव, हींगोली

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.