Eknath Shinde । “मी कधीच कुणाला घाबरत नाही, नाही तर मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो नसतो”

Eknath Shinde । गडचिरोली : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला स्थापन होऊन तीन महिन्यांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे. परंतु मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाल्यानंतर अजूनही दुसरा विस्तार करण्यात आलेला नाही. त्यामुळं आता शिंदे गटासह भाजपमधील नाराज नेत्यांचं मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्ताराकडे लक्ष लागलेलं आहे. त्यातच आता विदर्भ दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी इतर गोष्टीवर भाष्य केलं आहे.

एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया-

आज एकनाथ शिंदे गडचिरोलीत आले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे हे पहिल्यांदाच गडचिरोलीत (gadchiroli) आले आहेत. या ठिकाणी नक्षलवाद्यांशी दोन हात करणाऱ्या जवान आणि पोलिसांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोलीत आले आहेत. त्यांनी छत्तीसगडच्या बॉर्डरवरील जंगलात येऊन त्यांनी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले कि, मला भीती असती तर मी गडचिरोलीत आलोच नसतो. मी कधीच कुणाला घाबरलो नाही. परिस्थितीला तोंड देण्याचं काम केलं म्हणून तर मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो, असं म्हणत त्यांनी नक्षलवाद्यांना इशारा देतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही नाव न घेता टोला लगावला.

आपले जवान कसं काम करतात, कोणत्या परिस्थितीत करतात हे पाहिलं पाहिजे. तसेच जवानांच्या पाठी सरकार खंबीर आहे हा मेसेज गेला पाहिजे. आपले जवान आणि गृहखातं नक्षल्यांना मुँह तोड जवाब द्यायला तयार आहे. या जंगलात नक्षलवाद्यांचा वावर असतो. गेल्या काही वर्षात नक्षलवाद कमी होत आहे. आपले जवान काम करत आहेत. त्यांनी आपला प्रभाव दाखवला आहे. आपल्याला आपल्या बॉर्डरही सेफ करायच्या आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर होईल ना. योग्यवेळी सर्व गोष्टी होत राहतात, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या विस्तारात विदर्भाला स्थान मिळेल का? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावर, मंत्रिमंडळ विस्तारात सर्वांचा विचार केला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.