Explained | शिंदे गटाला जनसामान्यांमधून विरोध का? एकनाथ शिंदेंनी विश्वासार्हता गमावली?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ४० आमदारांसह मोठा बंड केला. २०१९ पासून राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता संपुष्टात आली. आपल्या पक्षातचं बंड झाल्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यावेळी एकनाथ शिंदे व बंडखोर आमदारांवर गद्दारीचा शिक्का मारण्यात आला. महाराष्ट्रात मोठा भूकंप एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने घडवून आणला. याच भाजपला कंटाळून एकनाथ शिंदे यांनी २०१४ मध्ये भर स्टेजवर राजीनामा दिला होता. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप देखील केले होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी धोका केल्यामुळे, बाळासाहेब ठाकरे यांचे कुटुंब ‘शिवसेना’ फोडल्यामुळे जनसामान्यांमध्ये रोष आहे. शिवसेना फोडल्यानंतर एकनाथ शिंदे संपूर्ण पक्ष (शिवसेना) हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये नाराजी आहे. ४० आमदारांचा पाठींबा, महाराष्ट्रावर सत्ता, मुख्यमंत्री पद मिळाले तरी शिंदे गटाला जनसामान्यांमधून विरोध का होत आहे. हे जाणून घेऊया.

एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेससोबत युती नको म्हणून बंड केला. असे कारण त्यांनी स्वत: दिले होते. त्यानंतर त्यांनी पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत म्हणून देखील टीका केली. एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी – काँग्रेस नको होती तर त्यांनी २०१९ ला विरोध का नाही केला. २०१९ बंड का नाही केला. अडीच वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर त्यांनी बंड केला, यामागे मुख्यमंत्री होण्याची लालसा होती?, असा प्रश्न नागरीक उपस्थित करत आहेत. दसरा मेळावा झाल्यानंतर अनेक नागरीकांनी हे उघडपणे बोलून देखील दाखवले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंड केल्याचा कारणावर शंका उपस्थित करण्यात येत आहेत.

भाजपच्या ऑपरेशन लोटसचा महाराष्ट्र देखील एक भाग?-

भाजपच्या इतर राज्यात सुरु असलेले ऑपरेशन लोटसचा महाराष्ट्र देखील एक भाग होता. गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक अरुनाचल प्रदेशनंतर भाजपने महाराष्ट्रात शिवसेना पक्ष फोडून सत्ता मिळवली. यात शिंदे गट सहभागी असल्यामुळे जनतेची नाराजी आहे. शिवसेनेतील बंडाला केंद्रातील अमित शहांपासून ते राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी मदत केल्याचे एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलून दाखवले होते. त्यामुळे ४० आमदार फोडण्याचा खरा सुत्रधार भाजप असल्याचे सिद्ध होते. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री फक्त भाजपचं करु शकत होते. कारण भाजपला उद्धव ठाकरे नको होते. २०१९ ला देवेंद्र फडणवीस यांची अजित पवार यांच्याशी फसलेली खेळी, त्यांनतर स्थापन झालेली महाविकास आघाडी भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट अमित शहा यांना आव्हान दिले होते. शिवसेना संपवली तर राज्यातील सत्ता काय मुंबई देखील काबीज करता येईल हा भाजपचा मास्टर प्लॅन असावा. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना हाताशी धरुन भाजपने महाराष्ट्रात भूकंप केला, अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये आहे.

एकनाथ शिंदे भाजपचे मुख्यमंत्री आहेत का?

उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेले काम जनतेच्या मनात आहे. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता, समर्थक असो यांनी कोरोना संकटाचा मुकाबला एकत्र येत केला होता. मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले. उद्धव ठाकरेंवर टीका केली. जग बंद असताना महाराष्ट्र सुरु राहावा, अशी अपेक्षा कदाचीत एकनाथ शिंदेंची असावी. असे त्यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणातून दिसून आले. त्यामुळे शिवसेनेवर दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे भाजपचे मुख्यमंत्री आहेत का?, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. कारण जेव्हा तत्कालिन सरकारने महाराष्ट्रात लॉकडाऊन केले, सर्व धर्मांचे प्रार्थनास्थळे बंद केली. तेव्हा एकनाथ शिंदे देखील सत्तेचा भाग होते. आता ते विरोध करत आहेत. ते आता भाजपची भाषा बोलत असल्याची टीका होत आहे.

राज्यातील प्रकल्प इतर राज्यात गेले, रोजगार गेला-

शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर वेदांता सारखा मोठा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. त्यानंतर औरंगाबाद येथील ऑरिक सिटी येथे 424 कोटींचा वैद्यकीय उपकरणे पार्क प्रस्तावित होता. तो देखील राज्यात आला नाही. बल्क ड्रग पार्क देखील इतर राज्यात गेला. योग्य पद्धतीने प्रस्ताव सादर न केल्याने प्रकल्प नामंजूर करण्यात आला, अशी टीका शिंदे सरकारवर होत आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील बेरोजगारीत भर पडली.

शिंदे गटातील नेत्यांवरील ईडी कारवाई थांबली-

शिंदे गटातील अनेक नेत्यांवर ईडी चौकशीची ससेमिरा लागली होती. भाजप नेते किरीट सोमय्या तर या नेत्यांच्या मागे हात धवून लागले होते. मात्र भाजपसोबत हातमिळवणी करताच चौकशीचे दारे बंद झाले. यामध्ये आमदार प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, खासदार भावना गवळी यांचा समावेश आहे.

प्रताप सरनाईक ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक मानले जायचे. कथित एनएससीएल घोटाळ्याप्रकरणी सरनाईक ईडीच्या रडारवर होते. त्यांची मालमत्ता देखील ईडीनं जप्त केली होती. दरम्यान हे प्रकरण शांत आहे. तसेच शिंदे गटातील आमदार यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. यशवंत जाधवही आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या रडारवर होते. आयकर विभागाने जाधव यांच्यावर छापेमारी देखील केली होती. यात 40 प्रॉपर्टी जप्त केल्या होत्या. ईडीने जाधव यांना मनी लॉंडरिंग प्रकरणी चौकशीसाठी नोटीस देखील बजावली होती. या प्रकरणात सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले होते.

शिंदे गटात असलेल्या खासदार भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमधील गैरव्यवहार प्रकरणी देखील ईडीने नोव्हेंबर महिन्यात आरोपपत्र दाखल केलं होते. त्याची 3.5 कोटी रूपयांची मालमत्ता देखील ईडीने तात्पुरती जप्त केली आहे, मात्र त्या शिंदे गटात गेल्यापासून आणि भाजपला पाठींबा दर्शवल्यापासून हे प्रकरण शांत आहे. यामुळे हे ईडीचे सरकार असल्याची टीका होत असते.

उद्धव ठाकरेंवर थेट टीका महागात पडेल?

शिंदे गटातील अनेक आमदार, मंत्री थेट शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव यांच्यावर टीका करतात. एकेरी उल्लेख करतात. शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी तर उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर देखील टीका केली होती. बाळासाहेब ठाकरे असताना ठाकरे कुंटुंबावर कोणीही टीका करत नव्हतं. मात्र आता मोतोश्री आणि ठाकरे कुटुंबावर थेट टीका होत आहे. हे निष्ठावंत शिवसैनिकांना आवडणारे नाही. त्यामुळे याचा फटका शिंदे गटातील आमदारांना निवडणुकीत बसू शकतो.

शिवसेनेवर ताबा मिळवण्याची तयारी –

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या, स्थापन केलेल्या शिवसेनेवर एकनाथ शिंदे बंड केल्यानंतर ताबा सांगत आहेत. याबाबत न्यायालयात खटला देखील सुरु आहे. दसरा मेळावा, युवासेना, स्थानिक कार्यकारणी एकनाथ शिंदेंनी हायजॅक केली. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. बंड केल्यानंतर शिंदे गटाने स्वत:चे अस्तित्व निर्माण करावे किंवा दुसऱ्या पक्षात विलिन व्हावे, अशी जनसामान्यांची प्रतिक्रिया आहे. शिवाजी पार्कवर जमलेल्या गर्दीने हे सिद्ध झाले आहे.

शेतकरी संकटात-

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. धार्मिक सण-उत्सवात ते व्यस्थ होते. आता कोरोना संपला आहे. त्यामुळे सर्व सण-उत्सव जोरात साजरे होणारचं होते. मात्र हे आम्ही केलं म्हणून शिंदे गटाने पाट थोपटून घेतली. शेतकरी ओल्या दुष्काळाचा सामना करत असताना एकनाथ शिंदे गणपती मंडळाना भेटी देत होते. मुख्यमंत्री घरोघरी दर्शनाला गेले तर राज्य कोण सांभाळणार, असा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला होता. मात्र आतापर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही. यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे.

भाजपला कंटाळून एकनाथ शिंदेंनी भर स्टेजवर दिला होता राजीनामा-

राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्तेत भागिदार झालेले एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी भाजपच्या त्रासाला कंटाळुन भर व्यासपिठावर जनतेच्या समक्ष आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. २०१४ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले. काही दिवस सरकार चालल्यानंतर भाजप आणि सेनेचे खटके उडायला लागले. भाजपवर शिवसैनिक नाराज होते. उद्धव ठाकरेंनी देखील ही नाराजी बोलून दाखवली होती. देवेंद्र फडणवीस बॉसिंग करायचे आणि शिवसेनेला दुय्यम लेखायचे, असा आरोप तेव्हाच्या शिवसेना मंत्र्यांनी केला होता. याबाबत पहिला आवाज एकनाथ शिंदे यांनी उठवला होता. कल्याण-डोंबिवलीतील सभेत जाहीरपणे त्यांनी भाषण करून दडपशाहीच्या, हुकूमशाहीच्या राजवटीत मी मंत्री राहू शकत नाही, असे सांगत स्टेजवरच उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, या प्रकरणाला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी देखील दुजोरा दिला आहे.

राजीनामा देताना काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

“भाजपकडून कार्यकर्त्यावर अत्याचार होत असतील तर उघड्या डोळ्यांनी मी पाहू शकत नाही. मी भाजपच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसू शकत नाही. मी कॅबिनेटमध्ये बसू शकत नाही. कारण मी उघड्या डोळ्यांनी होणारे अत्याचार पाहत आहे, हे मी नाही पाहू शकत. मी प्रथम शिवसैनिक आहे. नंतर मंत्री आहे. त्यामुळे शिवसैनिकाच्या वेदना आणि भावना मला माहित आहेत. म्हणून मी आज माझ्या मंत्रिपदाचा, माझ्या पालकमंत्री पदाचा राजीनामा देत आहे.” एकनाथ शिंदेंचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भूमिका बदलल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.