शेतकरी आंदोलन : दिल्लीतील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा बंद करण्याचे आदेश

दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं आहे. दिल्लीमध्ये आंदोलकांनी पोलिसांसमोर तलवारी बाहेर काढल्याने परिस्थिती चिघळली आहे. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

यानंतर आता मोदी सरकारकडून काही कडक पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता दिल्लीच्या काही भागांमधील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा बंद करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने काही वेळापूर्वीच स्थानिक प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीची बैठक बोलवली असून, उपाययोजनांवर चर्चा सुरू आहे.

गृहमंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार सिंघु, टिकरी आणि मुकरबा या या तणावग्रस्त भागातील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता दिल्लीत या निर्णयाचे काय पडसाद उमटणार हे पाहावे लागेल. आतापर्यंत काश्मीरमध्ये आपातकालीन प्रसंगात असंतोष पसरु नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्याचा पर्याय सर्रास अवलंबिला जातो. यापूर्वी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) ईशान्य दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारावेळीही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवासस्थान असलेल्या 7 लोककल्याण मार्गावरील सुरक्षाव्यवस्थेतही कमालीची वाढ करण्यात आल्याचे समजते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा