जाणून घ्या मुंबईत होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिपबद्दल सर्वकाही

मुंबई । अमॅच्‍युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांचेवतीने यंदाच्या वर्षी फेडरेशन चषक कबड्डी स्‍पर्धेचे यजमानपद मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनला मिळाले आहे. दिनांक ९ ते १२ फेब्रुवारी २०१८ दरम्यान सायंकाळी ६ ते रात्रौ १० यावेळेत, एस.आर.पी. ग्राउंड, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, जोगेश्वरी (पूर्व ) येथे ही स्पर्धा ‘Proven Kabaddi’ या नांवे संपन्‍न होणार आहे.

५ हजार प्रेक्षक क्षमतेच्या, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेल्या भव्य कबड्डी नगरी मध्ये व १३ x १० मीटर आकाराच्या दोन सींथेटीक मॅटवर हे सामने विद्युत प्रकाश झोतात खेळविले जाणार आहेत. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील उप-उपांत्य फेरीमधील – महाराष्ट्र, सेनादल, कर्नाटक, उत्तराखंड, राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश व रेल्वे हे ८ पुरूष संघ व महाराष्‍ट्र, हिमाचल प्रदेश, पंजाब, रेल्‍वे, हरयाणा, उत्‍तर प्रदेश, केरळ, छत्‍तीसगड हे ८ महिला संघ या स्पर्धेमध्ये विजेते पदासाठी लढणार आहेत.

या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून १९२ खेळाडू, ३६ पंच, १६ संघ व्यवस्थापक, १६ संघ प्रशिक्षक यांचेसह २० क्रिडा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Loading...

मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन तर्फे आयोजित केलेल्‍या या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते होणार आहे.स्‍पर्धेचे स्‍वागताध्‍यक्ष राज्‍यमंत्री रविंद्र वायकर असून इंटरनॅशनल कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष जनार्दन सिंह गेहलोत, अमॅच्‍युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्‍या अध्यक्षा सौ. मृदुल भदोरिया, सरकार्यवाह श्री. दिनेश पटेल, महाराष्‍ट्र राज्‍य कबड्डी असोसिएशनचे अध्‍यक्ष प्रा.किशोर पाटील, कार्याध्‍यक्ष डॉ. दत्‍ता पाथरीकर, सरकार्यवाह अॅड. आस्‍वाद पाटील, मुंबईचे महापौर प्रि. विश्‍नाथ महाडेश्‍वर, शिवसेना नेते सर्वश्री मनोहर जोशी, सुधीर जोशी, लिलाधर डाके, पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडू, पंच, प्रशिक्षक, पदाधिकारी व प्रमुख मान्यवरांची निवास व्यवस्था विविध हॉटेल्स मध्ये करण्यात आली असून, एस.आर.पी. मैदानापासून ते निवास स्थानापर्यंत वाहतूक व्यवस्था देखील पुरविण्यात आली आहे. खेळाडूंना सकस आहार मिळेल या गोष्टीवर असोसिएशन विशेष लक्ष ठेवून आहे. खेळाडूंना काही शारीरिक दुखापत झाल्यास प्रथमोपचार तसेच रुग्णवाहिकेची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

राष्ट्रीय कबड्डी खेळाडू राणाप्रताप तिवारी, किशोर गावडे व भाई परब या तिघांच्या ओघवत्या वाणीतून सामन्यांचे धावते समालोचन होणार आहे. प्रेक्षकांना व खेळाडूंना सामन्याचा आढावा घेता यावा यासाठी इलेक्ट्रोनिक गुण फलकाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या स्‍पर्धेच्‍या विजेत्‍या व उपविजेत्‍या संघांना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरवण्‍यात येणार आहे त्‍याचप्रमाणे राष्‍ट्रीय कबड्डी स्‍पर्धेतील विजेत्‍या महाराष्‍ट्र कबड्डी संघाचा कर्णधार रिशांक देवाडिगा तसेच महाराष्‍ट्राचा पुरूष कबड्डी संघ, इराण येथील आशियाई कबड्डी स्‍पर्धा विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघाची कर्णधार अभिलाषा म्हात्रे, राष्‍ट्रीय कबड्डी स्‍पर्धेतील महाराष्‍ट्राच्‍या महिला कबड्डी संघाची कर्णधार सायली जाधव व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पंच आरती बारी यांचा तसेच छत्रपती व अर्जुन पुरस्‍कार विजेते खेळाडूंचा आयोजकांमार्फत विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचे मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर यांनी सांगितले.

मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनला या स्पर्धेचे यजमान पद पहिल्यांदाच मिळत असून ९ ते १२ फेब्रुवारी दरम्यान होणारी ही स्पर्धा अधिक भव्य, आकर्षक व यशस्वी करण्यासाठी शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांच्या नेतृत्वाखाली, असोसिएशनचे उपाध्यक्ष गुरुनाथ खोत, दत्ता दळवी, प्रतापराव शिंदे, कार्याध्यक्ष सुधाकर घाग, उपकार्याध्यक्ष पांडुरंग पार्टे, प्रवीण सावंत, सरकार्यवाह रमेश हरयाण, खजिनदार सुहास कदम, उपखजिनदार मंगेश गुरव यांच्यासह सौ.मनिषा राणे, संदीप सावंत, प्रसाद जोशी, शरद राणे, नितीन सावे, संदीप कानसे, संजय केंबळे, गौरव कळमकर, अमित चिविलकर व हरिश्चंद्र विश्वासराव हे अहोरात्र मेहनत घेत आहेत.

या स्‍पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्‍यजी ठाकरे, माजी उपमुख्‍यमंत्री अजित पवार, क्रिडामंत्री विनोद तावडे यांच्‍या शुभहस्‍ते संपन्‍न होणार असून शिवसेना नेते सर्वश्री परिवहन मंत्री दिवाकर रावते, केंद्रीय मंत्री अनंत गीते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार आनंदराव अडसूळ व खासदार चंद्रकांत खैरे प्रमुख अतिथी म्‍हणून उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेच्या आयोजनाच्या दर्जाबाबत सांगताना खासदार कीर्तिकर यांनी आवर्जून सांगितले कि, ही स्‍पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी म्‍हणून आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत. कबड्डी खेळाचा व खेळाडूंचा पाहुणचार उत्‍कृष्‍ट असेल यासाठी असोसिएशन कुठलीही त्रुटी ठेवणार नाही. देशभरात जो प्रतिसाद आणि प्रसिध्‍दी क्रिकेट या खेळला मिळते तेवढीच कबड्डीलाही मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.