“अखेर मोदी सरकार झुकलं, पंतप्रधान मोदींनी देशाची माफी मागत तीन कृषी कायदे घेतले मागे”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 9 वाजता पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं. यावेळी मोदींनी देशात नव्याने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यावर भाष्य केलं. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रानं विरोधकांचा विरोध डावलून संसदेत बळाच्या जोरावर संमत केलेल्या कृषी कायद्यांचा फायदा पुन्हा एकदा वाचून दाखवला. सोबतच, हे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. या तपस्येत कमी राहिली असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. तसेच देशवासियांशी संवाद साधताना मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे. या महाअभियानात देशात तीन कृषी कायदे आणण्यात आले होते. या उद्देश देशातील शेतकऱ्यांना अधिक ताकद मिळाली, उत्पादनाची योग्य किंमत, पर्याय मिळावेत. अनेक वर्षांपासून ही मागणी होती. आधीही अऩेक सरकारांनी यावर मंथन केले होते. यावेळीही संसदेत चर्चा झाली, नंतर हे कायदे आणले. देशातील कानाकोपऱ्यातील कोट्यवधी शेतकरी, अनेक शेतकरी संघटनांचे याचे स्वागत केले. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशातील कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, गरीबांच्या उज्वल भविष्यासाठी सत्यनिष्ठेने, शेतकऱ्यांप्रति पूर्ण समर्पणभावनेतून प्रामाणिकपणे हे कायदे सरकारने आणले होते. पण एवढी पवित्र गोष्ट, पूर्णरुपाने शुध्द, शेतकऱ्यांच्या हिताची बाब आम्ही आमच्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही. शेतकऱ्यांचा एकच वर्ग याला विरोध करत होता. पण तरीही हे आमच्यासाठी महत्वाचे होते. कृषी अर्थतज्ज्ञ, वैज्ञानिक, प्रगतीशील शेतकऱ्यांनीही कृषी कायदेचे महत्व समजावून सांगण्याचे खूप प्रयत्नही केले.

आम्ही विनम्रपणे, खुल्या मनाने त्यांना समजावत होतो. अनेक माध्यमातून व्यक्तिगत, सामूहिक चर्चा होत होती. शेतकऱ्यांचे तर्क समजवून घेण्यात काहीच कसर सोडली नाही. त्यांची हरकत असलेल्या तरतुदी बदलण्यासाठीही सरकार तयार झाली होती. दोन वर्षांपर्यंत हे कायदे स्थगित करण्याचाही प्रस्ताव दिला. याचदरम्यान हा विषय सर्वोच्च न्यायालयातही गेला. या सर्व गोष्टी देशासमोर आहेत. त्यामुळे यात अधिक विस्तारात जाणार नाही.

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा