अखेर उत्पल पर्रीकरांनी भाजपविरोधात दंड थोपटले; पणजीतून अपक्ष लढण्याची केली घोषणा

 पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत सध्या सगळ्यात चर्चेचा विषय ठरला आहे, तो म्हणजे दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपकडून तिकीट मिळणार की नाही. याबद्दल आता यावर चर्चा सुरु झाल्या आहेत. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट उत्पल पर्रीकर यांना निवडुण आणण्याची जबाबदारी घेतली आहे. यानंतर आदमी पक्षाने देखील उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी देण्याची ऑफर दिली आहे.

त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उत्पल यांना पक्ष प्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे. अन्यथा ते अपक्ष लढल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. गोव्यात ४० विधानसभा जागा आहेत. ज्यामध्ये भाजपने आपले ३४ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपने ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सध्या सर्वांचे लक्ष उत्पल पर्रिकर यांना कोणत्या जागेचे तिकिट मिळणार याकडे आहे.

भाजपने जाहीर केलेल्या यादीत उत्पल पर्रिकरांचे नाव नाही आहे. त्यांना पणजीतून उमेदवारी देणार नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आज उत्पल पर्रीकर यांनी आपली पुढची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा करत भाजपविरोधात बंडाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत गोव्याच्या राजकारणात मोठा बॉम फोडला. मनोहर पर्रीकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला असला तरी मी भाजपविरोधात नाही, असं ते म्हणाले.

तसेच पुढे ते म्हणाले, तत्त्वांसाठी माझी लढाई आहे. माझ्याबाबत पणजीच्या जनतेला ठरवू द्या. पणजीतील जनतेनं मनोहर पर्रीकरांवर प्रेम केलं. मी खूप मोठी रिस्क घेत आहे. मी फार कठीण मार्ग निवडला आहे. माझ्या राजकीय भवितव्याची खूप जणांनी चिंता व्यक्त केली. मात्र माझ्या राजकीय भवितव्याची कुणी चिंता करू नये. गोव्याची जनता माझी चिंता करेल. तुम्हाला माहिती आहे की, मनोहर पर्रीकर यांनी दोन दशके पणजीचं प्रतिनिधित्व केलं. पणजीच्या लोकांनी केवळ मनोहर पर्रीकरांना मत दिलं होतं.

कारण पर्रीकर हे मूल्यांच्या बाजूने होते. त्यामुळे मी या मुद्द्यांच्या बाजूने आहे. माझ्या वडिलांनी पक्ष मजबूत केला. मलाही पणजीत मजबूत करायचा आहे. मागील आणि या निवडणुकीतही मी पक्षाकडे विनंती केली. मला पणजीतील मतदारांचं समर्थन असतानाही पक्षाकडून तिकीट मिळू शकलं नाही. केवळ संधिसाधूला तिकीट दिलं आहे. त्यामुळे मी पणजीतून अपक्ष म्हणून लढणार असल्याचे उत्पल पर्रीकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा