“मला सोनिया गांधींना आठवण करुन द्यायची आहे की तुमची सासू…”; कंगनाची पोस्ट चर्चेत

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिने याबाबतचा खुलासा केला आहे. तसेच कंगनाने या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यावर आता कंगणाने पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण केले आहे.

कंगनाने नुकतंच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यातील पहिला फोटोत ती तिच्या आई आणि बहिणीसोबत सुवर्णमंदिरात जात असल्याचे दिसत आहे. तर पुढील फोटो हे संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याप्रकरणी आहेत. या सर्व फोटोंसोबत तिने सर्व गोष्टींबाबत मौन सोडत भाष्य केले आहे.

यावेळी कंगना म्हणाली, “मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांचे स्मरण करुन मी लिहिले की, देशद्रोह्यांना कधीही माफ करू नका किंवा विसरु नका. या घटनेत देशातील काही अंतर्गत देशद्रोहींचा हात असू शकतो. देशातील अनेक देशद्रोही अशाप्रकारे विरोधकांना मदत करतात, त्यामुळेच अशाप्रकारच्या घटना घडतात. माझ्या या पोस्टवर मला अनेकांकडून सतत धमक्या येत आहेत. भटिंडा येथील एकाने तर मला उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली.”

पुढे कंगना म्हणाली “मी अशाप्रकारच्या धमक्यांना अजिबात घाबरत नाही. देशाच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांविरोधात आणि दहशतवाद्यांविरोधात मी बोलते आणि नेहमीच बोलत राहीन. अनेक निष्पाप जवानांची हत्या करणारे नक्षलवादी असो, तुकडे तुकडे गँग असो किंवा आठव्या दशकातील पंजाबमधील गुरुंच्या पवित्र भूमीचे तुकडे करून खलिस्तान बनवण्याचे स्वप्न पाहणारे परदेशात बसलेले दहशतवादी असोत.”

“मी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधीजी यांना आठवण करून देऊ इच्छिते की, तुम्ही देखील एक महिला आहात. तुमची सासू इंदिरा गांधीजी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत या दहशतवाद्यांविरुद्ध जोरदार लढा दिला. त्यामुळे कृपया तुमच्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना अशा दहशतवादी, विघटनकारी आणि देशविरोधी व्यक्तींकडून येणाऱ्या धमक्यांविरोधात त्वरित कारवाई करण्याचे निर्देश द्यावे. मी धमकी देणाऱ्यांच्या विरोधात पोलीस तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे मला आशा आहे की पंजाब सरकार यावर लवकरच कारवाई करेल. माझा देश माझ्यासाठी सर्वस्व आहे. देशाच्या हितासाठी देशद्रोह्यांच्या विरोधात उघडपणे बोलत राहीन.” असे कंगना म्हणाली.

 

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या