नेटफ्लिक्सने सिरीयल बनवली तर अजितदादांना कमीत कमी 2-3 कोटी रॉयल्टी मिळेल; सोमय्यांचा पुन्हा निशाणा

मुंबई : गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून काल छापे टाकण्यात आले होते. तसेच जरंडेश्वर साखर कारखान्यावरही छापा टाकला. पार्थ पवार यांच्यासह अजित पवार यांच्याशी संबंधित लोकांच्या एकूण ४० रहिवाशांच्या आणि व्यावसायिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं कळत आहे. याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता.

यानंतर पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांच्याबाबत वक्तव्य केलय. किरीट सोमय्या यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्याचे मूळ मालक हे अजित पवारच असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत काही कागदपत्रेही दाखवली आहेत. अजित पवारांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी आणि विक्रीमध्ये घोटाळा केला आहे.

जरंडेश्वरमध्ये अजित पवार आणि त्यांच्या बहिणी मालक, भागधारक आहेत. बहिणींच्या नावे अजित पवारांनी बेनामी संपत्ती जमवली आहे. आयकर विभागाचे छापेमारी त्याच संदर्भात सुरु असून अजित पवारांनीच आता सांगावे की, बहिणींच्या घरी धाडी का टाकण्यात आल्या आहेत. अजित पवारांच्या बहिणीचे पती मोहन पाटील जरंडेश्वर साखर कारखान्याचे संचालक आहेत. पवार कुटुंबीयांच्या अनेक बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर असलेली भारतातील ही आयकर विभागाची सगळ्यात मोठी धाड आहे. यावर नेटफ्लिक्सने सिरीयल बनवली, तर अजित पवारांना कमीत कमी 2 ते 3 कोटी रॉयल्टी मिळू शकते. यातला सिझन 1 हा अजित पवार असेल, असा टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगावला. पवार कुटुंबाचा हिशोब चुकता करणार, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याला किरीट सोमय्यांनी उत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा