उद्या लोकांचं बरेवाईट झालं तर त्याला उदयनराजेच जबाबदार राहतील : शशिकांत शिंदे

सातारा : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कडक लॉकडाऊनचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारच्याविरोधात हाती कटोरा घेऊन भिक मागो आंदोलन केलं. साताऱ्याच्या रस्त्यावर फिरुन आणि फुटपाथवर बसून त्यांनी भिक मागत सरकारच्या निर्णयाचा विरोध केला. सरकारच्या भूमिकेमुळं राज्यातील गोरगरीब जनता, कामगार, छोटे व्यवयासिक यांच्यावर भिक मागण्याची वेळ येईल, असं मत उदयनराजेंनी व्यक्त केलंय. उदयनराजेंच्या या आंदोलनाला राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं.

उदयनराजे भोसले राज्यात लॉकडाऊन नको असं सांगत आहेत. पण पुढे चालून लोक मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह आले आणि त्यांच्या जिवाचं काही बरंवाईट झालं तर त्याला उदयनराजेच जबाबदार असतील, असं प्रत्युत्तर शशिकांत शिंदे यांनी दिल. उदयनराजे यांचं आंदोलन हे केंद्र सरकारसाठी आहे. केंद्र सरकार राज्याला अपूर्ण सुविधा देतं आहे. त्यापासून लक्ष विचलीत करण्यासाठी उदयनराजेंचं आंदोलन असल्याची टीका शिंदे यांनी केली.

लोकप्रतिनिधी म्हणून निर्णय घेताना परिस्थितीचं गांभिर्य ओळखून योग्य निर्णय घेणं गरजेचं झालं आहे. विकेंड लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तुटणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आता कोरोना रुग्णांची आकडेवारी तिप्पट झाली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी लॉकडाऊन केला नाही तर परिस्थिती आणखीनच वाईट होईल, अशी भीतीही शिंदे यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा