“शरद पवारांसारखी माणसे काँग्रेस पक्षात उरली नसतील तर त्यास जबाबदार कोण?”, शिवसेनेचा सवाल

कोरोनाच्या काळात केंद्र सरकार अपयशी ठरत असताना विरोधकांनी मैदानात उतरण्याची गरज आहे, असे म्हणत सामना संपादकीयमधून शिवसेनेने पुन्हा एकदा मजबूत विरोधी पक्षाची गरज बोलावून दाखवली आहे.

“काँग्रेस पक्षाने पुढचा काळ प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करावे. सध्याच्या सरकारविषयी लोकांच्या मानात रोष निर्माण होतोय. बेरोजगारी, अर्थसंकट, महागाई, कोरोनामुळे पडलेल्या प्रेतांचा खच यामुळे केंद्र सरकारची लोकप्रियता घसरणीला लागली. अशा वेळी देशभरातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी ‘ट्विटर’च्या फांद्यांवरून उतरून मैदानात उतरणे गरजेचे आहे. पुन्हा मैदानावर उतरणे म्हणजे कोरोना काळात गर्दी करणे नाही. तर सरकारला प्रश्न विचारून भंडावून सोडणे, हे एक महत्त्वाचे काम सर्वच विरोधी पक्षांना रोज करावे लागेल. काँग्रेसने त्या कामी पुढाकार घ्यावा. सोनियांना बहुधा हाच संदेश द्यायचा असावा,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“मानवी जीवनात वाईट पुष्कळ असते, चांगले थोडे असते. संस्थेच्या जीवनात चांगले पुष्कळ असू शकते, वाईट कमी असू शकते. व्यक्ती अगर संस्था यांच्या जीवनात जेव्हा संघर्ष उभा राहतो व त्यास तोंड देण्यासाठी जेव्हा ते सर्व सामर्थ्यानिशी उभे राहतात आणि आयुष्याची बाजी लावून लढतात, तेव्हा ते सारे मोठे होतात. दुबळे असून कसे रणधुरंधर योद्धय़ासारखे लढतात. काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्य लढय़ातून लोकांत व देशात रुजला. स्वातंत्र्य लढय़ातील संघर्षाने अनेक सामान्य कार्यकर्तेही मोठे झाले, पण त्या छोटय़ांचे नेतृत्व करणारी मंडळी थोर होती. दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, राम मनोहर लोहिया, नाना पाटील हे सर्व एके काळी काँग्रेसचे धुरंधर होते. महाराष्ट्रातील शरद पवार यांनी उभी हयात काँग्रेस पक्षात घालवली. आज अशी माणसे काँग्रेस पक्षात उरली नसतील तर त्यास जबाबदार कोण?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा