“आज बाळासाहेब असते तर…,” क्रांती रेडकरचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई : आर्यन खान प्रकरणात अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे वादात सापडले आहेत. या गंभीर आरोपांनंतर त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला होता. यानंतर आता क्रांतीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे.

“लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करु नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करु नये हे त्या दोघांनी शिकवलं…तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे…लढते आहे… सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायत…

आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं….एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खासगी हल्ले हे राजाकारणांच किती नीच स्वरुप आहे, हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आज ते नाही पण तुम्ही आहात…त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो…तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आमि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे…तुम्ही कधीच माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही याची मला खात्री आहे… म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय….तुम्ही योग्य तो न्याय करा, अशी विनंती.” असे पत्र क्रांतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा