दिवाळी स्पेशल- जाणून घ्या का दीपावली पाडवा साजरा केला जातो.

दीपावली पाडवा

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा. प्रतिपदा या शब्दाचं गावरान बोलीतलं स्वरूप म्हणजे ‘पाडवा’ हा शब्द! ग्रामीण भागात या दिवसाला ‘बलिप्रतिपदा’ म्हणतात. शेतकऱ्यांचा लोककल्याणकारी आद्य राजा बळी याचं स्मरण करण्याचा दिवाळीतील हा सर्वाधिक महत्त्वाचा दिवस. याच दिवशी वामनाने बळीला पृथ्वीवरून पाताळात ढकलले अशी पुराणकथा आहे.

खरंतर ते एक रूपक असावं. खरी गोष्ट, या देशातील मूळ शेतीसंस्कृती व नंतरच्या काळात उदयाला आलेल्या इतर संस्कृतींमधील झगडय़ात, शेतकऱ्याला व शेतीला दुय्यम स्थान मिळण्यास सुरुवात झाली, ही आहे. समाजव्यवस्थेच्या शीर्षस्थानी असणारा शेतकरी नंतरच्या काळात दुय्यम (पाताळ) स्थानी ढकलला गेला, त्याची सुरुवात या दिवशी झाली असावी असा अर्थ यातून काढला जाऊ शकतो. ‘दिन दिन दिवाळी..’ या लोकगीतातली शेवटची ओळ, ‘इडा-पिडा टळो, बळीचं राज्य येवो’ अशी आहे व याचा अर्थ स्पष्ट आहे.

‘इडा (इला)’ म्हणजे जमीन आणि बळी म्हणजे शेतकरी. जमिनीला आपल्या संस्कृतीत अन्नदेवता म्हटलंय. जमिनीवरील संकट टळून बळी म्हणजे शेतकरी राजा झाल्याशिवाय हा देश समृद्ध होणार नाही हाच संदेश यातून दिला जातो. सध्या झालेल्या शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीवरून याची जाणीव आणखी तीव्र होते. वामनाने जरी बळीला पाताळात ढकललं असलं तरी हा देश व या देशातील शेतकरी हजारो वर्षे उलटूनही बळीला अद्याप विसरलेला नाही हेच यातून सिद्ध होतं. या दिवशी विक्रमसंवत सुरू होतं. शहरी व्यापाऱ्यांचं किंवा उत्तर

भारतातल्या लोकांचं नवं वर्ष या दिवशी सुरू होतं. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या, कीर्द-खतावणीच्या चोपडय़ा या दिवशी नवीन हिशोबासाठी सज्ज होतात. पाडवा हा साडेतीन मुहुर्तामधला ‘अर्धा’ शुभमुहूर्त आहे. शहराकडे या दिवशी बायकोने नवऱ्याला ओवाळायची प्रथा काही समाजात आहे.

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा