‘उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी वाड्रा याच काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार’

मुंबई : उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी-वाड्रा याच काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहेत. प्रियांका गांधी यांच्याच नेतृत्वाखाली ४०३ जागांवर काँग्रेस लढेल, असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी राजेश तिवारी यांनी केला आहे. ‘लोकांना प्रियांका गांधी यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचे आहे. येथे पुढील वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका प्रियांका यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील.

सर्व विधानसभा जागांवर पक्ष आपले उमेदवार उभे करेल. जनतेसोबतच काँग्रेस कार्यकर्ते आणि उत्तर प्रदेशचे पदाधिकारीही प्रियांकांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितात.’ समाजवादी पक्ष किंवा राज्यातील इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्याची चर्चा नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेसला बूथ स्तरापर्यंत मजबूत करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच, ज्याप्रमाणे छत्तीसगडमध्ये 15 वर्षे सत्तेबाहेर राहिल्यानंतर बूथ स्तरावर जोरदार यश मिळाले आहे, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातही प्रयोग केले जात आहेत, असेही तिवारी म्हणाले.

उल्लेखनीय म्हणजे, उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे १०० हून अधिक पदाधिकारी गेल्या तीन दिवसांपासून छत्तीसगडमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. या नेत्यांना काँग्रेसच्या इतिहासापासून ते बूथ मॅनेजमेंटपर्यंत माहिती दिली जातेय. त्यांना खुद्द छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडून निवडणुकीचे धडे मिळत आहेत. या प्रशिक्षणातही प्रियांका गांधी बुधवारी सायंकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा