IND vs AUS 1st Test | टीम इंडियाचा दणदणीत विजय! 132 धावांनी केला ऑस्ट्रेलियाचा पराभव

IND vs AUS 1st Test | नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना नागपूर येथे खेळला गेला. या सामन्यामध्ये भारतीय संघाने 132 धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. या विजयानंतर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेमध्ये टीम इंडियाने पहिल्या डावाच्या जोरावर 223 धावांनी आघाडी घेतली आहे.

या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियन संघाला महागात पडला आहे. कारण टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन संघ 63.5 षटकांमध्ये गुंडाळला होता. टीम इंडियाने  ऑस्ट्रेलियाला 177 धावांमध्ये गुंडाळले. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या एकाही खेळाडूला अर्धशतक करता आले नाही.

IND vs AUS 1st Test मध्ये भारतीय गोलंदाजांचा बोलबाला

या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांचा बोलबाला होता. भारताकडून दुसऱ्या डावात अश्विनने पाच विकेट घेतल्या. तर रवींद्र जडेजानेही त्याला चांगली साथ देत पाच विकेट आपल्या नावावर केल्या. या सामन्यातील फलंदाजीबद्दल बोलायचे झाले, तर कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 120 धावा आपल्या नावावर केल्या. तर अक्षर पटेलने 84 आणि रवींद्र जडेजांने 70 धावांचे योगदान दिले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. हा सामना 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर या मालिकेतील तिसरा सामना धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तिसरा सामना 1 ते 5 मार्च दरम्यान होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या सामन्याच्या ठिकाणात बदल केला जाऊ शकतो.