औद्योगिक उत्पादनात १.१ टक्क्याची घसरण,देशभरात आर्थिक मंदीचे चटके

भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदीचे चटके आता मोठ्याप्रमाणात जाणवायला सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादनात १.१ टक्क्याची घसरण नोंदवण्यात आली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भांडवली वस्तू (पुरक उपकरणे व वस्तू) व दीर्घकालीन ग्राहकोपयोगी वस्तू (कन्झ्युमर ड्युरेबल्स) उत्पादनात घट झाल्याने एकूण औद्योगिक उत्पादनास फटका बसला.या क्षेत्राची ही सात वर्षांतील खराब कामगिरी ठरली. यापूर्वी नोव्हेंबर २०१२मध्ये या क्षेत्राचे उत्पादन १.७ टक्क्यांनी घटले होते. तसेच वीजनिर्मिती आणि खाण क्षेत्राच्या सुमार कामगिरीनेही औद्योगिक उत्पादन घटण्यास हातभार लावला आहे.

एप्रिल ते ऑगस्ट या काळात औद्योगिक उत्पादन ५.३ टक्क्यांवरून २.४ टक्क्यांपर्यंत खाली आले. उत्पादन क्षेत्राला याचा सर्वाधिक फटका बसला. उत्पादन क्षेत्रात १.२ टक्क्यांची घसरण नोंदवली गेलीय. तर वीजनिर्मिती क्षेत्रातही ०.९ टक्क्याची घट झाली आहे.यापूर्वी वाहननिर्मिती क्षेत्रात अशाप्रकारची घसरण पाहायला मिळाली होती. या परिस्थितीमुळे अनेक वाहन कंपन्यांनी सध्या आपल्या उत्पादनात घट केली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील अनेकांचे रोजगार गेले आहेत. खरेदीदारांकडून नव्या वाहनांना मागणी नसल्यामुळे सप्टेंबरमध्ये प्रवासी वाहन विक्रीमध्ये घसरण राहिली आहे. यंदा सलग ११ व्या महिन्यात या क्षेत्राने घसरण नोंदविली, तर औद्योगिक उत्पादन निर्देशांकात घट झाली आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सातत्याने आर्थिक उपाययोजना जाहीर केल्या जात आहेत. त्यामुळे भांडवली बाजारात मध्यंतरी सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले होते. मात्र, प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रात त्यामुळे फारसा फरक पडला नव्हता. आगामी काळ हा सणासुदीचा असल्याने बाजारपेठेतील मागणी वाढून परिस्थिती काहीप्रमाणात सुधारेल, अशी अपेक्षा आहे. परंतु, तसे न घडल्यास केंद्र सरकार काय पावले उचलणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.