राजकारणाऐवजी मदत ४ कोटी ७५ लाखांची ‘ती’ इंजेक्शन्स भाजप देणार

मुंबई : भाजपचे नेते कोरोनाचे राजकारण करीत असल्याची टीका महाविकास आघाडी सरकारकडून होत असताना आता प्रदेश भाजपने एक वेगळाच आदर्श घालून देणारा निर्णय घेतला आहे. भाजपच्या वतीने सरकारला रेमडिसिवीरची तब्बल ५० हजार इंजेक्शन्स भेट म्हणून देण्यात येणार आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आ.प्रसाद लाड हे सोमवारी दमणमध्ये गेले आणि तेथील ब्रुक फार्मा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक केजरीवाल यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

ही कंपनी आतापर्यंत आपल्याकडे उत्पादित रेमडिसिवीर इंजेक्शन्सची शंभर टक्के निर्यात करीत होती. केंद्र सरकारने या निर्यातीवर बंदी आणल्यानंतर कंपनीने उत्पादन थांबविले होते. तथापि, दरेकर आणि लाड यांनी त्यांच्याकडे ५० हजार इंजेक्शन्सची मागणी नोंदविली. येत्या दोनतीन दिवसात हा साठा भाजपच्या नेत्यांकडे सुपुर्द केला जाईल आणि त्यानंतर फडणवीस यांच्या हस्ते हा साठा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट म्हणून देण्यात येणार आहे. एका इंजेक्शनची किंमत ही ९५० रुपये आहे. याचा अर्थ ४ कोटी ७५ लाख रुपयांची इंजेक्शन्स ही भाजपकडून सरकारला भेट म्हणून दिली जाणार आहेत.

ही इंजेक्शन्स महाराष्ट्रात आणायची तर राज्याच्या अन्न व औषधी प्रशासनाची लेखी परवानगी लागते. ती मिळावी यासाठी दरेकर हे दमणमधूनच अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी बोलले. दोघांनीही त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दमणमधून महाराष्ट्रात ही इंजेक्शन्स न्यायची तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचीदेखील परवानगी लागते. ती उद्याच देण्याचे आश्वासन केंद्राकडून देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा